सोलापूर : दिवंगत पीएसआय केरू रामचंद्र जाधव यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त केरू रामचंद्र जाधव गौरव समितीच्या वतीने विविध क्षेत्रांतील मान्यवरांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. मंगळवारी, २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १० च्या समादेशक डॉ. दिपाली काळे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्याची माहिती समितीच्या अध्यक्षा सुमित्रा केरू जाधव यांनी दिली.
ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक दत्ता गायकवाड यांना विशेष जीवनगौरव, ज्येष्ठ कामगार नेते अशोक जानराव यांना कामगार मित्र, सुचित्रा विठ्ठल थोरे यांना आदर्श धम्मकार्य, तर रत्नदीप कांबळे यांना सहकार भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. धम्म चळवळ व बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी योगदान देणारे नागसेन माने यांना धम्ममित्र पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. समादेशक डॉ. दिपाली काळे यांना गुणवंत महिला पोलीस अधिकारी, उपसंपादक विजय गायकवाड यांना गुणवंत पत्रकार, तर राष्ट्रसंत शाळेच्या मुख्याध्यापिका मंजुश्री खंडागळे यांना गुणवंत शिक्षिका पुरस्कार जाहीर झाला आहे.
पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह व वृक्षाचे रोपटे असे असून, पुरस्कारार्थींचा कुटुंबीयांसह सत्कार करण्यात येणार आहे. सोहळ्यास भदंत सुमेधजी नागसेन महाथेरो यांच्यासह फुले-आंबेडकरी व बौद्ध धम्म चळवळीतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पुरस्कार वितरणानंतर समता सैनिक दलाच्या वतीने धम्म संस्कार सोहळा होईल.
कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन सुमित्रा केरू जाधव, अण्णासाहेब भालशंकर, समता सैनिक दलाचे जीओसी शांतीकुमार कांबळे, चंद्रकांत कोळेकर व विनोद जाधव यांनी केले आहे.
——
Post Views: 9