बार्शी – एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालय व संशोधन केंद्र (MITCORER), बार्शी येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या स्थापत्य अभियांत्रिकी विद्यार्थी संघटनेतर्फे (CESA) वंचित व गरजू विद्यार्थ्यांसाठी सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम राजीव गांधी केंद्रीय निवासी प्राथमिक व माध्यमिक (अ.जा.) आश्रम शाळा, पांगरी, ता. बार्शी येथे यशस्वीरीत्या संपन्न झाला.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण करणे, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणे आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन देणे हा होता. या उपक्रमाच्या माध्यमातून CESA च्या विद्यार्थी स्वयंसेवकांनी शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला, ज्ञानाची देवाणघेवाण केली आणि त्यांच्यामध्ये सकारात्मक विचार व शिक्षणाची प्रेरणा निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
शिक्षण आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश
या सामाजिक उपक्रमामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना समाजसेवेचे महत्त्व आणि समाजाप्रती असलेल्या आपल्या जबाबदारीची जाणीव झाली. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सहानुभूती, सांघिक कार्य, नेतृत्वगुण आणि सामाजिक सेवेची भावना विकसित होण्यास मदत होते.
शैक्षणिक संस्था केवळ ज्ञानदानापुरत्या मर्यादित नसून समाजाच्या सर्वांगीण विकासामध्येही महत्त्वाची भूमिका बजावतात, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
या उपक्रमांतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन देण्यात आले. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंचे वाटप करुन त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लावण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या सामाजिक कार्यासाठी सुरज बी. गायकवाड, राजेश राऊत आणि एस के कन्टरक्शन यांनी मोलाचे सहकार्य केले.
सुरज बी. गायकवाड आणि Samyak Structural Consultancy यांच्याकडून विद्यार्थ्यांना ड्रॉइंग बुक्स, पेन, पेन्सिली, खोडरबर आणि इतर आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. तसेच, SK Construction यांच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमाचे आयोजन स्थापत्य अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. अमित शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. तसेच, CESA चे प्राध्यापक समन्वयक प्रा. निरंजन पाटील सर यांनी उपक्रमाच्या नियोजनामध्ये व समन्वयामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
CESA च्या अध्यक्षा गौरी पाटील यांच्या नेतृत्वाखाली CESA च्या सर्व समिती सदस्यांनी आणि विद्यार्थी स्वयंसेवकांनी या उपक्रमामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य व मार्गदर्शन करणारे संस्थेचे व्यवस्थापन, प्राचार्य, विभागप्रमुख, सर्व प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, प्रायोजक आणि CESA चे सर्व विद्यार्थी स्वयंसेवक यांचे संघटनेतर्फे आभार व्यक्त करण्यात आले.