जालना : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदवीधरांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांना निवडून द्यावे, असे आवाहन डॉ. विशाल धानुरे यांनी केले आहे. मागील १८ वर्षांच्या कार्यकाळात पदवीधरांच्या प्रश्नांवर ठोस काम झाल्याचे दिसून येत नसल्याची टीका करत त्यांनी विद्यमान नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पदवीधर मतदारसंघ हा केवळ निवडणुकीपुरता मर्यादित नसून सुशिक्षित बेरोजगार, विद्यार्थ्यांचे प्रश्न, शैक्षणिक क्षेत्रातील अनियमितता आणि तरुणांच्या भविष्याशी संबंधित प्रश्न मांडण्याचे महत्त्वाचे व्यासपीठ आहे. मात्र, या प्रश्नांना अपेक्षित न्याय मिळाला का, याचा विचार मतदारांनी करण्याची वेळ आली आहे, असे मत डॉ. धानुरे यांनी व्यक्त केले.
राज्यात पेपरफुटीच्या घटना समोर आल्यानंतर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, मानसिक ताण आणि भवितव्याबाबतची चिंता वाढली होती. अशा संवेदनशील प्रसंगी विद्यार्थ्यांच्या बाजूने ठामपणे उभे राहून त्यांच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडणे अपेक्षित होते. मात्र, सतीश चव्हाण यांनी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ ठोस भूमिका घेतल्याचे दिसून आले नाही, अशी टीका डॉ. धानुरे यांनी केली. पदवीधर मतदारांनी केवळ आश्वासनांना भुलून न जाता उमेदवाराचे काम, त्याची भूमिका आणि पदवीधरांच्या प्रश्नांबाबतची बांधिलकी तपासावी. शिक्षण क्षेत्रातील प्रश्न, बेरोजगारी, भरती प्रक्रियेतील पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज आहे. पदवीधरांचा आवाज शासनदरबारी बुलंद करण्यासाठी डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांना संधी द्यावी, असे आवाहन डॉ. विशाल धानुरे यांनी केले. पदवीधरांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे नेतृत्व निवडणे ही काळाची गरज असून, मतदानातून बदल घडवून आणावा, असेही त्यांनी नमूद केले.