सांगोला – नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून महिलांना स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने आपुलकी प्रतिष्ठान, सांगोला या सामाजिक संस्थेच्या वतीने दोन गरजू महिलांना शिलाई मशीन भेट देण्यात आल्या. या उपक्रमामुळे संबंधित महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हातभार लावण्यास मदत होणार आहे. सध्या सर्वत्र नवरात्रोत्सवाची धामधूम सुरू असून, या उत्सवाच्या निमित्ताने महिलांचा सन्मान करण्याबरोबरच गरजू महिलांना रोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्याचा स्तुत्य उपक्रम आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात आला. याअंतर्गत उज्वला बनसोडे आणि सोनाली बोधे यांना उदरनिर्वाहाचे साधन म्हणून शिलाई मशीन भेट देण्यात आल्या. केवळ मदत करण्यापुरते मर्यादित न राहता गरजू महिलांना स्वावलंबी बनविणे आणि त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. या सामाजिक उपक्रमातून महिलांच्या सक्षमीकरणाचा आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देण्यात आला. यावेळी आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव, चंद्रशेखर कवडे, अरविंद डोंबे गुरुजी, महादेव बोराळकर, अशोक सावंत, संदीप खाटपे उपस्थित होते.