सोलापूर – सोलापूर विभागातील अशासकीय अनुदानित कला, वाणिज्य, विज्ञान, विधि व अध्यापक महाविद्यालयांतील विद्यापीठाने मान्यता दिलेल्या तासिका तत्वावरील (CHB) पात्र अध्यापकांच्या मानधनाची देयके विहीत वेळेत सादर न करणाऱ्या महाविद्यालयांवर उच्च शिक्षण सहसंचालक सोलापूर कार्यालयाने कडक भूमिका घेतली आहे.
सोलापूरचे विभागीय सहसंचालक डॉ. अजयकुमार जाधव यांनी सर्व प्राचार्यांना तातडीचे परिपत्रक काढून प्रलंबित देयके तत्काळ सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
पत्रकात नमूद केल्यानुसार, दरमहा ५ तारखेस मानधनाची मागणी कार्यालयाकडे करणे आवश्यक असतानाही काही महाविद्यालये वेळेत मागणी सादर करत नाहीत, ही बाब प्रशासकीय दृष्टीने अत्यंत अयोग्य आहे. ज्या महाविद्यालयांनी मागणी केली होती, त्यांचे ऑगस्ट २०२६ पर्यंतचे मानधन अदा करण्यात आले आहे. तथापि, ज्या महाविद्यालयांचे जुलै २०२६ ते सप्टेंबर २०२६ या कालावधीतील मानधन अद्याप प्रलंबित आहे, त्यांनी त्वरीत देयके सादर करावीत, असे निर्देश देण्यात आले आहेत.
सप्टेंबर अखेरपर्यंत देयके न दिल्यास ऑक्टोबरचे वेतन रोखणार!
तासिका तत्वावरील एकही प्राध्यापक मानधनापासून वंचित राहणार नाही, याची वैयक्तिक दक्षता प्राचार्यांनी घ्यावी. या इशाऱ्यानंतरही जी महाविद्यालये सप्टेंबर २०२६ अखेरची मानधनाची देयके सादर करणार नाहीत, त्यांच्या ऑक्टोबर २०२६ चे वेतन अदा केले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा सहसंचालकांनी दिला आहे. याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्राचार्य व महाविद्यालयाची राहील, असेही पत्रकात नमूद आहे.




















