सोलापूर : भारतीय बौद्ध महासभेच्या सोलापूर जिल्हा पूर्व पुरुष, महिला व शहर शाखेच्या वतीने ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मंगळवार २० ऑक्टोबर रोजी विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त शहरातून मिरवणूक काढण्यात येणार असून, विविध ठिकाणी महामानवांना अभिवादन, पुष्पांजली आणि वंदना करण्यात येणार आहे.
१४ ऑक्टोबर १९५६ रोजी अशोक विजयादशमीच्या दिवशी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा देऊन ऐतिहासिक धम्मक्रांती घडवून आणली. भगवान गौतम बुद्धांनी सारनाथ येथे धम्मचक्र प्रवर्तन केले, तर सम्राट अशोकाने धम्माचा प्रसार केला. या ऐतिहासिक परंपरेचे स्मरण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची धम्मचळवळ गतिमान करण्याचा संकल्प या कार्यक्रमातून करण्यात येणार आहे.
बुधवारी सकाळी ९ वाजता न्यू बुधवार पेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे जिल्हाध्यक्ष सत्यजित जानराव आणि महिला जिल्हाध्यक्ष निर्मलाताई कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. त्यानंतर समता सैनिक दलातर्फे मानवंदना देण्यात येणार आहे. सकाळी १० वाजता उद्यानात पुष्पांजली वंदना करून मिरवणुकीला सुरुवात होईल.
या मिरवणुकीदरम्यान मिलिंद नगर बुद्ध विहार व प्रेरणाभूमी अस्थिविहार येथे पुष्पांजली आणि मानवंदना देण्यात येईल. नवी पेठेतील जुन्या नगरपालिका कार्यालयात महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून वंदना घेण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात समता सैनिक दलाच्या वतीने पुतळ्यास मानवंदना व पुष्पांजली अर्पण केली जाईल. त्यानंतर बुद्धनगर फॉरेस्ट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हायस्कूलच्या मैदानावरील बोधिवृक्षासमोर पूजा वंदना करून मिरवणुकीचा समारोप होईल.
या मिरवणुकीत जिल्ह्यातील पुरुष व महिला पदाधिकारी, समता सैनिक दलाचे सैनिक, केंद्रीय शिक्षक-शिक्षिका, माजी श्रामणेर, बौद्धाचार्य, माजी पदाधिकारी तसेच शहरातील बौद्ध उपासक-उपासिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सरचिटणीस बाबासाहेब क्षिरसागर, जिल्हा कोषाध्यक्ष दत्तात्रय सिद्धगणेश, महिला शाखेच्या सरचिटणीस नंदा काटे, कोषाध्यक्ष मीनाक्षी बनसोडे, समता सैनिक दलाचे जिल्हाप्रमुख यशवंत साबळे आणि शहरप्रमुख बाबू रणखांबे यांनी केले आहे.
—
Post Views: 6