सोलापूर : शहरात पाणीटंचाईची परिस्थिती असताना नळांना तोट्या न बसविता पाण्याचा अपव्यय करणाऱ्या पाच नागरिकांवर महापालिका प्रशासनाने प्रत्येकी २०० रुपयांचा दंड ठोठावला. महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी बुधवारी कुमठे गावातील मड्डी वस्ती परिसराची पाहणी केली असता पाण्याची नासाडी होत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर ही दंडात्मक कारवाई करण्यात आली.
आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी युगंधर हॉस्पिटल परिसरातील नाला, डीपी रोड, मजरेवाडी येथील नाला तसेच कुमठे गावातील मड्डी वस्ती परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप करंजे, नगर अभियंता नीलकंठ मठपती, सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे, विभागीय अधिकारी प्रकाश सावंत, मुख्य आरोग्य निरीक्षक लोखंडे, आरोग्य निरीक्षक, कनिष्ठ अभियंता, सहाय्यक अभियंता, नाल्यांच्या कामाशी संबंधित सल्लागार आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.
यावेळी नाल्यांची सद्यस्थिती, पाण्याचा निचरा, परिसरातील स्वच्छता आणि रस्त्यांशी संबंधित कामांचा आढावा घेण्यात आला. नाल्यांमधील अडथळे दूर करून पाण्याचा प्रवाह सुरळीत ठेवावा तसेच नागरिकांना त्रास होणार नाही यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
कुमठे गावात पाणीपुरवठ्याचा दिवस असल्याने पाहणीदरम्यान काही नळजोडण्यांना तोट्या नसल्याचे आढळले. त्यामुळे नळांमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून रस्त्यावर येत होते. पाणीटंचाईच्या काळात अशा प्रकारे पाण्याचा अपव्यय करणे गंभीर बाब असल्याने पाच नागरिकांवर प्रत्येकी २०० रुपयांचा दंड आकारण्यात आला.
पाणी रस्त्यावर वाहून जाणार
नसल्याची दक्षता घ्यावी
शहरातील उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर करून सर्व नागरिकांना पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. नळांना योग्य तोट्या बसवाव्यात, विनाकारण नळ सुरू ठेवू नयेत आणि पाणी रस्त्यावर वाहून जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. पिण्याचे पाणी वाहन धुणे, रस्ते धुणे किंवा अन्य अनावश्यक कामांसाठी वापरणे टाळावे, असे आवाहन आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले. पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही तपासणी करून नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
——
Post Views: 12