वळसंग – दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गटातील १४ गावांना एकरुख उपसा सिंचन योजनेचे पाणी द्यावेत आणि दर्गनहळ्ळी एक्सप्रेस कालव्यातून बोरामणी तलाव भरून देण्याची मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा बोरामणी पंचायत समितीचे माजी सदस्य धनेश सुभाष आचलारे यांनी पुढ आमदार सुभाष देशमुख यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे यावेळी देशमुख यांनी संबंधित विभागाला पत्र देऊन आवश्यक कार्यवाही करण्याची सूचना केली आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यात दुष्काळ पडला असून सर्वत्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे मनुष्यासह पशुधनांचा पिण्याचा पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे त्या पार्श्वभूमीवर पाण्याच्या मागणीसाठी आचलारे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आमदार देशमुख यांची भेट घेऊन त्यांना यासंबंधी निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी आचलारे म्हणाले,बोरामणी गटातील १४ गावातून जाणा-या एकरुख उपसा सिंचन योजनेच्या कालव्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीतून हा कालवा गेला, त्यांनाच सिंचनाच्या पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ येत आली आहे.यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी असून, पाणी संघर्ष समितीच्या माध्यमातून यापूर्वी आंदोलने आणि मोर्चे काढूनही मागणी प्रलंबित असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
या १४ गावांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी निरा खोऱ्यातून उजनी धरणात येणाऱ्या पाण्यातून आवश्यक तरतूद करावी,दर्गनहळळी एक्सप्रेस कालव्यातून बंदिस्त पाइपलाइनद्वारे मौजे बोरामणी येथील तलाव पाण्याने भरण्यासाठी सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली.
यासंदर्भात आमदार सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित अधिकारी आणि पाणी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्याची विनंतीही करण्यात आली.
यावेळी देशमुख यांनी संबंधित विभागाला फोन करून १४ गावांना पाणी उपलब्ध करावे अशी सूचना दिली तसेच बोरामणी तलावात पाणी येण्यासाठी
सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर कामाचे अंदाजपत्रक तयार झाल्यावर या कामासाठी जिल्हा नियोजन विभागामार्फत निधी उपलब्ध करून देण्यात येईल अशी ग्वाही दिली.
यावेळी धनेश आचलारे यांच्यासह सुभाष पाटील, राजकुमार हुकीरे, राजकुमार देशमाने, मनोज कोरे, गौसभैय्या शेख, चन्नवीर मटगे, अप्पा हलसगे, मल्लिनाथ पटणे, संजय माळी, लक्ष्मीकांत आचलारे, मल्लिनाथ हुकीरे, संजय हुकीरे, अभिमन्यू भगरे, चंद्रकांत बिराजदार, विलास वाघमारे, श्रीकांत बिराजदार, अप्पा मटगे, अर्जुन हब्बू आदी उपस्थित होते.