सोलापूर : श्रीक्षेत्र आदमापूर या संत बाळूमामांच्या मूळ पीठाच्या धर्तीवर, उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी येथील संत बाळूमामा मंदिरात यंदाचा जन्मोत्सव सोहळा अत्यंत भव्य आणि अभूतपूर्व उत्साहात साजरा केला जाणार आहे. या महोत्सवाच्या मुख्य दिवसाचे विधीवत धार्मिक वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, मंदिराचे प्रमुख समन्वयक श्रीराम पाटील बेलाटीकर यांनी या नियोजनाची अधिकृत माहिती दिली आहे.
आदमापूर येथील पारंपरिक पद्धतीनुसारच बेलाटीमध्येही जन्मोत्सवाच्या मुख्य दिवशी पहाटे ठीक ६:०० वाजता मंगलमयी वातावरणात काकड आरती आणि विधीवत महापूजा संपन्न होणार आहे. बाळूमामांच्या मूळ परंपरेचे रक्षण करत या पूजेनंतर सकाळी पवित्र मेंढीपूजन सोहळा पार पडेल. दिवसभर मंदिरात अखंड हरीनाम सप्ताह, नामांकित कीर्तनकारांचे कीर्तन आणि भजन मंडळांचे कार्यक्रम रंगणार आहेत.
४:३० वाजता पाळणा सोहळा अन् भंडारा उत्सव:
सोहळ्याचे मुख्य आकर्षण असलेला संत बाळूमामांचा भव्य पाळणा कार्यक्रम दुपारी ठीक ४:३० वाजता पार पडेल. यावेळी ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ च्या गगनभेदी जयघोषात आणि अंगावर पिवळ्याधमक भंडाऱ्याची उधळण करत जन्मोत्सव सोहळा साजरा केला जाईल.
या ऐतिहासिक उत्सवासाठी सोलापूर शहर व संपूर्ण जिल्ह्यातून येणाऱ्या हजारो भाविकांसाठी दिवसभर दासोह अन्नछत्र (महाप्रसाद) आणि पाण्याचा उत्तम बंदोबस्त मंदिर समिती व बेलाटी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला आहे. आदमापूरची अनुभूती देणाऱ्या या पावन जन्मोत्सव सोहळ्याचा व महाप्रसादाचा लाभ सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन श्रीराम पाटील बेलाटीकर यांनी केले आहे.
—
Post Views: 6