पिलीव – महाराष्ट्र शासनाने शालेय पोषण आहारासाठी सुरू केलेल्या सेंट्रल किचन पद्धतीला महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना (आयटक), सोलापूर जिल्ह्याच्या वतीने तीव्र विरोध करण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो स्वयंपाकी व मदतनीस महिलांच्या रोजगारावर गदा येण्याची भीती व्यक्त करण्यात आली असून, ही पद्धत तातडीने रद्द करून पूर्वीप्रमाणे स्वयंपाकी व मदतनीसांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.
संघटनेचे राज्य संघटक तथा जिल्हाध्यक्ष कॉम्रेड विठ्ठलराव सुळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा शिक्षणाधिकारी यांना यासंदर्भातील निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, गेल्या सहा महिन्यांपासून शालेय पोषण आहार योजनेतील स्वयंपाकी व मदतनीसांचे मानधन तसेच इतर खर्चाची रक्कम शासनाकडून मिळालेली नाही. त्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या कामगारांना तातडीने थकीत मानधन देण्यात यावे. सेंट्रल किचन पद्धत रद्द करून शाळांमध्ये पूर्वीप्रमाणेच स्वयंपाकी व मदतनीसांच्या माध्यमातून पोषण आहार तयार करण्याची व्यवस्था सुरू ठेवावी.
सध्याच्या दुष्काळसदृश परिस्थितीत शासनाने ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती करणे आणि गोरगरीब विद्यार्थ्यांना सकस आहार उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. मात्र, विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष स्वयंपाक करणाऱ्या स्थानिक महिला व पुरुष कामगारांना रोजगारापासून वंचित ठेवून इस्कॉनसारख्या धार्मिक संस्थेला सरकारी काम देणे म्हणजे स्थानिक कामगारांच्या रोजगाराच्या हक्कांवर गदा आणणारे धोरण असल्याची टीका संघटनेने केली.
निर्णय रद्द न केल्यास आंदोलनाचा इशारा
सोलापूर जिल्ह्यातील सर्व स्वयंपाकी व मदतनीस या निर्णयाच्या विरोधात असून, शासनाने सेंट्रल किचन पद्धतीचा निर्णय रद्द केला नाही, तर संविधानिक व लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्वयंपाकी व मदतनीसांच्या खात्यावर थकीत मानधनाची रक्कम तातडीने जमा करण्याबाबत आश्वासन दिले. तसेच कर्मचाऱ्यांच्या भावना शासनापर्यंत तातडीने पोहोचविण्यात येतील, असेही त्यांनी सांगितल्याची माहिती संघटनेने दिली.
या निवेदनावर जिल्हाध्यक्ष कॉम्रेड विठ्ठलराव सुळे, जिल्हा सचिव सीमा खटकाळे, आदित्य घोडके तसेच संघटनेच्या इतर पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.