मंद्रूप – दक्षिण सोलापूर तालुक्यातील मोठे गाव असलेल्या मंद्रूपच्या प्रवेशद्वारावरच कचऱ्याचे ढीग साचल्याचे चित्र आहे. बसस्थानकापासून महात्मा फुले शाळेपर्यंत महामार्गालगत कचरा टाकला जात असल्याने परिसरात अस्वच्छता पसरली आहे. गावाच्या प्रवेशद्वारावरच दिसणारे हे चित्र मंद्रूपच्या प्रतिमेला धक्का देणारे ठरत आहे. तसेच येळेगावकडून मंद्रूपमध्ये येताना पुलाजवळही मोठ्या प्रमाणात टाकाऊ पदार्थ आणि कचरा दिसून येतो. या परिसरात रस्त्यावर कपडेही पडलेले आहेत. या महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांच्या नजरेस पडणाऱ्या अस्वच्छतेमुळे गावाची प्रतिमा मलिन होत आहे.
सुका आणि ओला कचरा वेगळा टाकण्यासाठी कचराकुंड्या उपलब्ध असतानाही त्यांचा योग्य वापर होत नसल्याचे दिसते. नागरिकांसह काही व्यावसायिकांकडूनही टाकाऊ पदार्थांची योग्य विल्हेवाट लावण्याबाबत जागरूकता आवश्यक आहे. उघड्यावर टाकलेल्या कचऱ्यामुळे डुक्कर आणि गाढवांसारख्या मोकाट जनावरांचा वावरही वाढत असून, सार्वजनिक स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होत आहे.
गाव स्वच्छ ठेवणे आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे ही ग्रामपंचायतीची महत्त्वाची जबाबदारी आहे. त्यामुळे महामार्गालगतच्या परिसरासह बसस्थानक आणि शाळेजवळ नियमित स्वच्छता राखणे, कचरा संकलनाची प्रभावी व्यवस्था करणे, नागरिक व व्यावसायिकांमध्ये जनजागृती करणे आणि नियमावली जाहीर करून तिची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. केवळ कचरा उचलण्यापुरते मर्यादित न राहता, मंद्रूपची प्रतिमा जपण्यासाठी प्रवेशमार्गावरील अस्वच्छतेचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, अशी अपेक्षा आहे.
Post Views: 22