मंगळवेढा – मंगळवेढा तालुक्यातील बंद करण्यात आलेली ४,७७७ रेशन कार्डे तातडीने पूर्ववत करावीत, रेशन कार्डधारकांना नियमित धान्य मिळावे तसेच पात्र गरीब-गरजू कुटुंबांना नवीन रेशन कार्ड देऊन धान्यपुरवठा सुरू करावा, या मागणीसाठी मंगळवेढा तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. हे आंदोलन सोमवार, २६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता तहसीलदार कार्यालयासमोर होणार आहे.
तालुक्यातील अनेक रेशन कार्डधारकांचे रेशन बंद झाल्यामुळे गरीब, गरजू, शेतमजूर आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसमोर अन्नधान्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असल्याचा आक्षेप काँग्रेस कमिटीने घेतला आहे. पात्र लाभार्थ्यांची यादी तपासून चुकीने बंद करण्यात आलेली रेशन कार्डे लगेच सुरू करावीत, अशी मागणी आंदोलनाच्या वतीने करण्यात येणार आहे.
या आंदोलनाला सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे दिवसभर उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी जाहीर केले आहे. आंदोलनादरम्यान तहसील प्रशासन व पुरवठा विभागाकडे मागण्यांचे निवेदन देण्यात येणार असून, लाभार्थ्यांचा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी करण्यात येईल.
याप्रसंगी मंगळवेढा तालुका व शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच रेशन बंद झालेले अन्यायग्रस्त लाभार्थी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेस कमिटीकडून करण्यात आले आहे.
मागण्या:
बंद करण्यात आलेली ४,७७७ रेशन कार्डे तातडीने पूर्ववत करावीत.
सर्व रेशन कार्डधारकांना नियमित धान्यपुरवठा सुरू करावा.
पात्र गरीब-गरजू कुटुंबांना नवीन रेशन कार्ड द्यावेत.
रेशन बंदीबाबत लाभार्थ्यांना पूर्व सूचना व न्यायपूर्ण तपासणी करावी.
फोटो कॅप्शन: रेशन कार्ड पूर्ववत करण्यासाठी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचे आवाहन करताना मंगळवेढा तालुका व शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी.