सोलापूर – आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी श्रद्धेने पायी तुळजापूरकडे निघालेल्या भाविकांचा प्रवास सुखकर व्हावा, त्यांना वाटेत आरोग्यविषयक अडचणींचा सामना करावा लागू नये, या उद्देशाने वळसंग येथे सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला. एस.आर.सी. प्रतिष्ठान आणि डॉ. कोठे गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय एंडोस्कोपी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर-अक्कलकोट महामार्गावरील वळसंग टोलनाका येथे भाविकांना मोफत औषधोपचार, पिण्याचे पाणी, चहा आणि बिस्किटांचे वाटप करण्यात आले.
कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजाभवानीच्या दर्शनासाठी मोठ्या श्रद्धेने पायी निघालेल्या भाविकांना रात्रीच्या प्रवासात थकवा, तहान आणि आरोग्याच्या किरकोळ समस्यांना सामोरे जावे लागते. अशा वेळी त्यांना आवश्यक सुविधा मिळाव्यात आणि प्रवासादरम्यान काही काळ विश्रांती घेता यावी, यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. SRC प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नागराज ऊर्फ अप्पू कोंडे यांच्या पुढाकारातून गेल्या पाच वर्षांपासून हा सेवायज्ञ सुरू आहे.
डॉ. सूर्यप्रकाश राजेश कोठे आणि श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे जन्मेजय भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत उपक्रमाची सुरुवात झाली. यावेळी वळसंगची ग्रामदैवता श्री रामलिंग चौडेश्वरी माता आणि आई तुळजाभवानी यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर पायी जाणाऱ्या भाविकांना आवश्यक सेवासुविधा पुरविण्यात आल्या.
यावेळी डॉ. सूर्यप्रकाश कोठे म्हणाले, “आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी श्रद्धेने पायी जाणाऱ्या भाविकांची सेवा करणे हे मोठे पुण्यकर्म आहे. त्यांच्या प्रवासात पाणी, चहा आणि औषधोपचार यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हीच खरी भक्ती आहे. अशा सेवाभावी उपक्रमांसाठी अधिकाधिक संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा.”
धार्मिक श्रद्धेला सामाजिक बांधिलकीची जोड देणाऱ्या या उपक्रमामुळे पायी प्रवास करणाऱ्या भाविकांना दिलासा मिळाला. ‘आई राजा उदे उदे, सदानंदीचा उदो उदे’च्या जयघोषात भाविकांनी या सेवेचा लाभ घेतला.
यावेळी माजी सरपंच श्रीशैल दुधगी, युवा हॉटेल उद्योजक सिद्धेश्वर मोरे, वेदमूर्ती पंडित हिरेमठ, बसवराज कलशेट्टी, पत्रकार इरण्णा जुजगार, कल्लाप्पा म्हेत्रे, मुक्तार कुरेशी, शंकर खैराटे, सोमनाथ हुणचळगी, विश्वनाथ मोटगी, सिद्धाराम सुरपुरे, चेतन अंकद, प्रेम खंबद, महेश खैराटे, श्रीशैल काबणे, सिद्धारूढ म्हेत्रे, सिद्धारूढ धडुते, राकेश मिसे, प्रमोद म्हेत्रे, आनंद सुरपुरे, बसवराज नीलगार, प्रशांत देगाव आणि कल्लाप्पा चनशेट्टी यांच्यासह एस.आर.सी. प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Post Views: 17