सोलापूर : येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याची तटबंदी, बुरुज आणि कमानी जीर्ण झाल्या असून त्यांची दुरवस्था झाली आहे. या ऐतिहासिक वारशाचे तातडीने संरक्षण, संवर्धन आणि जिर्णोद्धार करण्यात यावा, या मागणीचे निवेदन ‘शिवसेवक प्रतिष्ठान हिंदुस्थान’तर्फे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या मुंबई मंडळाच्या अधीक्षकांना देण्यात आले आहे.
शिवसेवक प्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष मारुती सुरवसे यांनी माहिती अधिकार अधिनियमांतर्गत अर्ज करून किल्ल्याच्या सुरक्षिततेबाबत माहिती मागविली होती. त्याला उत्तर देताना मुंबई मंडळाच्या पुरातत्त्व विभागाने १७ जून १९१२ रोजी संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळालेल्या या किल्ल्याचे संरचनात्मक लेखापरीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) झाले नसल्याची माहिती देण्यात आली. १६ ऑक्टोबर २०२६ रोजी दिलेल्या अधिकृत उत्तरात विभागाने स्ट्रक्चरल ऑडिट किंवा संरचनात्मक सुरक्षितता मूल्यांकन केले नसल्याचे तसेच यासंदर्भातील स्थळ तपासणी अहवाल तयार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच या किल्ल्याची जतनस्थिती चांगली आहे. किल्ल्याचे प्रभारी अधिकारी आणि इतर अधिकारी वेळोवेळी पाहणी करत असल्याचेही नमूद केले.
त्यामुळे ११४ वर्षांचा ऐतिहासिक वारसा जपताना सुरक्षिततेच्या तांत्रिक तपासणीकडे दुर्लक्ष झाले आहे का, असा सवालमारुती सुरवसे यांनी उपस्थित केला आहे.
सोलापूरच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याच्या सुरक्षिततेबाबत भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.किल्ल्याचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची, विशेष निधी मंजूर करण्याची आणि पारंपरिक शास्त्रीय पद्धतीने डागडुजी करण्यात यावी. पावसामुळे तटबंदी व बुरुज कोसळण्याचा धोका निर्माण झाल्याने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी
प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मारुती सुरवसे यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.
भुईकोट किल्ला हा सोलापूरच्या अस्मितेचा आणि पूर्वजांच्या इतिहासाचा अमूल्य ठेवा आहे. ११४ वर्षांपासून संरक्षित स्मारक असलेल्या किल्ल्याचे स्ट्रक्चरल ऑडिट झालेले नसेल, तर ही गंभीर बाब आहे. संभाव्य धोके वेळीच तपासून उपाययोजना करणार की एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार? असा प्रश्न मारुती सुरवसे यांनी उपस्थित केला आहे. ऐतिहासिक वास्तूचे शास्त्रीय पद्धतीने जतन व्हावे, हीच भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुरातत्त्व विभागाने तातडीने तज्ज्ञांमार्फत तपासणी करावी, अधिकृत अहवाल तयार करावा, मागील संवर्धनकामांचा तपशील आणि निधीची माहिती जाहीर करावी तसेच पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शिवसेवक प्रतिष्ठान हिंदुस्थानने केली आहे.
Post Views: 56