सोलापूर – शिक्षणाला वयाचे बंधन नसते, याची प्रचिती उत्तर सोलापूर तालुक्यात आयोजित पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान परीक्षेतून आली. तालुक्यातील ७५ परीक्षा केंद्रांवर पार पडलेल्या या परीक्षेला नोंदणी केलेल्या सर्व ७१६ नवसाक्षरांनी उपस्थिती लावली. त्यामुळे तालुक्यात परीक्षेची १०० टक्के उपस्थिती नोंदविण्यात आली.
नवसाक्षरांना वाचन, लेखन आणि संख्याज्ञानाची मूलभूत कौशल्ये आत्मसात करता यावीत, तसेच दैनंदिन व्यवहार आत्मविश्वासाने करता यावेत, या उद्देशाने ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेच्या माध्यमातून नवसाक्षरांच्या मूलभूत शैक्षणिक कौशल्यांचे मूल्यमापन करण्यात आले.
तालुक्यातील सर्व ७५ परीक्षा केंद्रांवर परीक्षेचे नियोजन करण्यात आले होते. संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी केंद्र संचालक म्हणून जबाबदारी पार पाडली. गटशिक्षणाधिकारी अविचल महाडिक आणि शिक्षण विस्तार अधिकारी बापूराव जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका समन्वयक बालाजी बलुले यांनी परीक्षेच्या नियोजनाची जबाबदारी सांभाळली.
परीक्षा प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी केंद्रप्रमुख आणि बीआरसीच्या कर्मचाऱ्यांनी विविध परीक्षा केंद्रांना भेटी देऊन व्यवस्थेची पाहणी केली. परीक्षा आयोजन, अंमलबजावणी आणि नवसाक्षरांचा सहभाग यांचा आढावा घेत आवश्यक समन्वय साधण्यात आला.
सर्व संबंधित अधिकारी, केंद्रप्रमुख आणि कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून परीक्षा सुरळीतपणे पार पडली. नोंदणी केलेल्या सर्व ७१६ नवसाक्षरांनी परीक्षेत सहभाग घेतल्याने उत्तर सोलापूर तालुक्याने शंभर टक्के उपस्थितीचे उद्दिष्ट साध्य केले. नवसाक्षरांचा उत्स्फूर्त सहभाग हा तालुक्यातील साक्षरता अभियानाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला.
Post Views: 16