सोलापूर : “विद्यार्थ्यांनी आपल्या स्वप्नांना भौगोलिक किंवा परिस्थितीजन्य मर्यादांचे बंधन घालू नये. तुमचा जन्म कुठे झाला, यावर तुमचे अंतिम ध्येय ठरत नाही. स्वप्ने मोठी ठेवा, ती साकार करण्यासाठी कठोर परिश्रम, चिकाटी व ध्येयाप्रती निष्ठा ठेवावी. आयुष्यभर शिकत राहा आणि स्वतःसाठीच नव्हे, तर इतरांसाठीही संधी निर्माण करा.” असे विचार ज्येष्ठ शास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी मांडले. केगाव, सोलापूर येथील एमआयटी विश्वप्रयाग युनिव्हर्सिटीच्या पहिल्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माईर्स एमआयटी शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष व कुलपती प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड होते, तर बालाजी अमाइन्सचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.
या समारंभात बीसीए, एमबीए आणि एमसीए या अभ्यासक्रमांतील एकूण ९० विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली, तर शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सात गुणवंत विद्यार्थ्यांना गुणवत्ता प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी एमआयटी विश्वप्रयाग युनिव्हर्सिटीच्या कार्यकारी अध्यक्षा प्रा. स्वाती कराड चाटे, कुलगुरू प्रा. गोपाळकृष्ण जोशी, प्र-कुलगुरू डॉ. विद्या निरंजन, बेंगळुरू येथील बायोवेट प्रा. लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एन. एस. श्रीनाथ, जेआयटीच्या सेंटर फॉर इनक्युबेशन, इनोव्हेशन, रिसर्च अँड कन्सल्टन्सी’ (CIIRC) चे संचालक डॉ. कृष्णा व्यंकटेश, कुलसचिव प्रा. प्राणेश मुरनाळ, परीक्षा नियंत्रक प्रा. प्रभा कासलीवाल, संचालक राघवेंद्र मुकुंदराज चाटे आणि विविध शाखांचे अधिष्ठाता यांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडला.
पुढे बोलताना डॉ. माशेलकर म्हणाले “शिक्षणाकडे केवळ पदवी मिळविण्याचे साधन म्हणून न पाहता, भविष्य घडविण्याची आणि समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याची संधी म्हणून पाहावे. उत्कृष्टतेचा ध्यास घेऊन कमी साधनांतून अधिकाधिक लोकांसाठी मूल्य निर्माण करावे. तंत्रज्ञानासोबत विवेकबुद्धी, सहानुभूती व प्रामाणिकपणाची जोपासना करावी”, असा संदेश त्यांनी पदवीधर विद्यार्थ्यांना दिला.
आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी “शिक्षणाचे अंतिम उद्दिष्ट ज्ञान, चारित्र्य आणि मानवतेची सेवा आहे. संत ज्ञानेश्वरांच्या वैश्विक तत्त्वज्ञानाचा वारसा घेऊन विद्यार्थ्यांनी विश्वाच्या कल्याणासाठी कार्य करावे आणि समाजाप्रती आपले उत्तरदायित्व निष्ठेने पार पाडावे, असे आवाहन केले.
समारंभाचे सन्माननीय अतिथी राम रेड्डी यांनी उद्योगक्षेत्रातील बदलत्या गरजांच्या पार्श्वभूमीवर “विद्यार्थ्यांनी ज्ञानासोबत प्रॅक्टिकल नॉलेज, प्रभावी संभाषण आणि बहु-कौशल्ये आत्मसात करणे काळाची गरज बनली आहे. कार्यक्षेत्रातील सकारात्मक दृष्टिकोनच विद्यार्थ्यांना भविष्यात यशस्वी बनवतो.” असे प्रतिपादन केले.
कार्यकारी अध्यक्षा प्रा. स्वाती कराड-चाटे पदवीधरांचे अभिनंदन करताना म्हणाल्या “दृढ निश्चय, समर्पण आणि प्रामाणिकपणाच्या बळावर जीवनातील कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीवर मात करता येते. एआयच्या युगात ‘शिका, जुने विसरा आणि पुन्हा नव्याने शिका’ ही वृत्ती अंगीकारल्यास कोणतेही तंत्रज्ञान मानवाला कालबाह्य ठरवू शकत नाही. मात्र, यशाच्या शिखरावर पोहोचताना विद्यार्थ्यांनी आपल्या मुळांशी असलेली नाळ कधीही तोडू नये. विज्ञानासोबत निसर्गाचे रक्षण आणि सर्व सजीवांचे सहअस्तित्व जपणे, हीच खरी शाश्वत प्रगती आहे.”
कुलगुरू प्रा. गोपाळकृष्ण जोशी म्हणाले “एमआयटी विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी दर्जेदार शिक्षण, नवोन्मेष आणि स्टार्ट अप्सच्या बळावर सोलापूरच्या सामाजिक-आर्थिक विकासाला नवी गती देत आहे. पर्यावरणपूरक संकुल, मियावाकी जंगल आणि जलसंधारणाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत, स्थानिक गरजांना जागतिक दर्जाच्या शिक्षणाची जोड देऊन सोलापूरला उत्कृष्ट ज्ञानकेंद्र बनवण्यासाठी विद्यापीठ कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.” समारंभाच्या सुरुवातीला प्रा. प्रभा कासलीवाल यांनी मान्यवरांचे स्वागत केले, प्रा. रूपाली धामणे यांनी सूत्रसंचालन केले आणि कुलसचिव प्रा. प्राणेश मुरनाळ यांनी आभार मानले.
Post Views: 22