पंढरपूर – तालुक्यातील उपरी गावच्या पठार वस्तीवर बिबट्या दिसल्याने एकच खळबळ उडाली आहे. उपरी पठार वस्तीमध्ये दूध डेअरीच्या शेजारी असलेल्या आसबे यांच्या डीपीसमोर गुरुवारी सायंकाळच्या सुमारास बिबट्या दिसल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
बिबट्या दिसल्याचे वृत्त गावात वाऱ्यासारखे पसरताच पठारवस्तीवरील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक शेतकरी सायंकाळी शेतातून घरी परतत असताना त्यांना बिबट्यासदृश प्राणी दिसल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून पंढरपूर तालुक्याच्या परिसरात बिबट्याच्या दर्शनाच्या घटना वाढल्या आहेत. उसाच्या शेतात आणि झाडीमध्ये बिबट्या लपून बसत असल्याचा अंदाज वन विभागाकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे वन विभागाने देखील तातडीने या ठिकाणी पिंजरा लावावा, अशी मागणीही ग्रामस्थ करत आहेत.
——————–
चौकट ( खबरदारीच्या सूचना )
दरम्यान, या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली असून, उपरी परिसरातील सर्व नागरिकांनी, विशेषतः लहान मुले आणि महिला यांनी सायंकाळी आणि पहाटे एकटे बाहेर पडू नये, शेतात जाताना गटाने जावे आणि सतर्क राहावे, असे स्थानिक ग्रामस्थांना वनविभाकडून आवाहन करण्यात आले आहे.
Post Views: 11