सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या विविध विभागांमार्फत शहरात राबविण्यात येणाऱ्या दैनंदिन नागरी सुविधा व विकासकामांना अधिक गती मिळावी, तसेच प्रशासकीय कामकाज अधिक कार्यक्षम व्हावे, यासाठी महानगरपालिकेच्या ताफ्यात सात नवीन बोलेरो गाड्या दाखल झाल्या आहेत.
आज इंद्रभुवन परिसरात महापौर विनायक कोंड्याल, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे तसेच जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांच्या हस्ते या सातही नवीन वाहनांचे विधिवत पूजन करण्यात आले.
महानगरपालिकेच्या वतीने केंद्र शासनाच्या गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस (GeM) पोर्टलच्या माध्यमातून थेट उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा यांच्याकडून ही सात वाहने खरेदी करण्यात आली आहेत. एका वाहनाची किंमत ७ लाख ६९ हजार ८७ रुपये असून, सात वाहनांसाठी एकूण ५३ लाख ८३ हजार ६०९ रुपये खर्च करण्यात आला आहे.
महानगरपालिकेच्या विविध विभागांना दैनंदिन कामकाजासाठी वाहनांची आवश्यकता असते. शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, विद्युत व्यवस्था, बांधकाम तसेच इतर नागरी सुविधांशी संबंधित कामांची पाहणी करणे, प्रत्यक्ष ठिकाणी भेट देणे आणि नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करणे यासाठी या वाहनांचा उपयोग होणार आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांना क्षेत्रीय स्तरावर कामकाज करणे सुलभ होऊन नागरी सेवांचा दर्जा सुधारण्यास मदत होणार आहे
यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, पृथ्वीराज कोंड्याल, कार्यकारी अभियंता (विद्युत) राजेश परदेशी, नगर अभियंता नीलकंठ मठपती, वाहन विभाग प्रमुख गिरीश पुकाळे, मुन्ना तळीखडे आदी मान्यवर व अधिकारी उपस्थित होते.
Post Views: 17