सोलापूर – “वैद्यकीय सेवा नागरिकांना शारीरिक आरोग्य आणि जीवनदान देते, तर पत्रलेखन सेवा नागरिकांच्या विचारांना उजाळा देते. पत्रलेखन हा संवादाचा मोठा सेतू असून, डॉक्टर हा रुग्णांसाठी देवदूतच असतो. शरीर निरोगी असेल तरच आपण आनंदी जीवन जगू शकतो. त्यामुळे पत्रलेखन सेवा आणि वैद्यकीय सेवा ही खऱ्या अर्थाने आदर्श जनसेवाच आहे,” असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ता व प्रमुख पाहुणे डॉ. शिरीष कुमठेकर यांनी केले.
सोलापूर जिल्हा वृत्तपत्र लेखक मंचातर्फे लोकमान्य टिळक सभागृह (हि. ने. वाचनालय), सोलापूर येथे आयोजित ‘कै. सौ. दानम्मा मल्लिकार्जुन किणगी स्मृती वैद्यकीय सेवा पुरस्कार’, ‘कै. तात्यासाहेब तेंडुलकर पत्रलेखक पुरस्कार’ आणि ‘वार्षिक पत्रलेखन पुरस्कार वितरण समारंभप्रसंगी’ ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी भूषवले, तर मंचाचे अध्यक्ष फैय्याज शेख आणि कार्यवाह अरुण धुमाळ व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमात उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ. विजय कानेटकर यांना ‘कै. सौ. दानम्मा मल्लिकार्जुन किणगी स्मृती वैद्यकीय सेवा पुरस्काराने’ तर प्रेमचंद मेने यांना ‘कै. तात्यासाहेब तेंडुलकर पत्रलेखक पुरस्काराने’ मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच विविध वृत्तपत्र लेखकांसाठीच्या वार्षिक पुरस्कारांचे वितरणही पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. पुरस्कारांचे स्वरूप सन्मानपत्र, शाल, पुस्तक आणि पुष्पगुच्छ असे होते.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. श्रीकांत येळेगावकर म्हणाले, “वैद्यकीय क्षेत्र हे आपल्या समाजाचा कणा आहे. सामान्य नागरिकांच्या मदतीसाठी ‘पत्रलेखन’ हा एक मोठा आधार असतो. नागरिकांच्या जीवनाशी संबंधित समस्या योग्य शब्दांत शासन दरबारी पोहोचवायची असते, तेव्हा ‘पत्रलेखक’ त्यांच्यासाठी तारणहार ठरतो. पत्रलेखक आपल्याला आपले हक्क, विचार आणि संवाद कागदावर उतरवण्याची ताकद देतो. वैद्यकीय सेवा व पत्रलेखन सेवा ही दोन्ही क्षेत्रे समाजसेवाच आहेत, आपण त्यांच्या सेवेचा सदैव आदर केला पाहिजे.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीवल्लभ करकमकर यांनी केले, तर आभार प्रा. धनंजय शहा यांनी मानले. सोहळ्याच्या यशस्वितेसाठी कार्यकारिणी सदस्य मयुरेश कुलकर्णी, रामकृष्ण अघोर, विठ्ठलराव वठारे, मल्लिकार्जुन किणगी, प्रांजली मोहीकर, अनुराधा निकम, बाळासाहेब उबाळे, डॉ. श्रीकांत कामतकर, पद्माकर कुलकर्णी, अॅड. धनंजय माने, अॅड. साराह शेख, बाबा शेख, महेजबीन मुल्ला आदींसह मोठ्या संख्येने वृत्तपत्र लेखक व नागरिक उपस्थित होते.
Post Views: 15