सोलापूर : उजनी जलाशयाशेजारी होणाऱ्या ए आय डेटा सेंटरवरून आमदार रोहित पवार उजनीतील पाण्याचा कळवळा येत असल्याचे नाटक करत आहेत. परंतु भिगवणच्या सिनारमास कंपनीला गेल्या कित्येक वर्षांपासून उजनीचे पाणी दिले जात आहे. ती कंपनी कोणाच्या बापाची आहे ? ए आय डेटा सेंटर सारख्या सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या समृद्धीत भर घालणाऱ्या विकास प्रकल्पाला विरोध करणारे आमदार रोहित पवार बेअक्कल आहेत. आणि त्यांचे कार्यकर्ते महाबेअक्कल आहेत, अशी जहरी टीका आमदार देवेंद्र कोठे यांनी शनिवारी आमदार रोहित पवार यांच्यावर केली. ए आय डेटा सेंटरला विरोध करणाऱ्या आमदार रोहित पवार यांच्या विरोधात सोलापूरकरांनी शनिवारी रस्त्यावर उतरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात जनसमर्थन आंदोलन केले.
यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. धिक्कार असो धिक्कार असो, रोहित पवारांचा धिक्कार असो, सोलापूरकर तरुणांचा रोजगार हिरावून घेऊ इच्छिणाऱ्या रोहित पवारांचा धिक्कार असो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, रोहित पवारांचं करायचं काय, खाली मुंडी वर पाय अशा घोषणांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक दुमदुमून गेला. या आंदोलनास तरुणांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, रोहित पवार म्हणजे लबाड लांडगा असून शेतकऱ्यांना पुढे करून सोंग करत आहे. रोहित पवार आणि महाविकास आघाडीकडून राज्यातील मेट्रो, समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड, नाणार अशा अनेक प्रकल्पांना वारंवार विनाकारण विरोध झाला आहे. सध्या देखील भीमाशंकर पासून १६ किलोमीटर दूर असलेल्या टोरंट प्रकल्पाला खोट्या विमर्शाद्वारे विरोध केला जात आहे. उजनी जलाशयाच्या केवळ ९ टक्के भागावर होणाऱ्या सोलार पॅनल प्रकल्पामुळे पाण्याचे बाष्पीभवन टळून तब्बल दीड टीएमसी पाणी वाचणार आहे. शेजारी शासनाच्याच जमिनीवर ए आय डेटा सेंटर प्रकल्प होणार असल्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार नाहीत. उर्वरित केवळ १२ एकरावरील भूसंपादनासाठी देखील शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याचे शासनाने मान्य केले आहे. येथील मत्स्यव्यवसाय देखील उर्वरित ९१ टक्के जलाशयावर करता येणार आहे. याशिवाय २ हजार ८०० जणांना कायमस्वरूपी तर ४२ हजार जणांना अप्रत्यक्ष रोजगार या एआय डेटा सेंटरच्या माध्यमातून मिळणार आहे. परंतु सोलापूरचे वाटोळे करण्याचे, विकासाला अडथळा आणण्याचे काम आमदार रोहित पवार करत आहेत.
याप्रसंगी यावेळी महापौर विनायक कोंड्याल, माजी आमदार दिलीप माने, भाजपाच्या शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, स्थायी समितीच्या सभापती रंजिता चाकोते, माजी शहर अध्यक्ष रामचंद्र जन्नू, माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, अविनाश महागावकर, दिलीप पतंगे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, मनीष देशमुख आदी उपस्थित होते.
चौकट
५० वर्षे घरात सत्ता असून देखील प्राथमिक माहितीही नसलेल्या आमदार रोहित पवार यांच्या अकलेची कीव येते. सोलापूर जिल्ह्यासह परिसराचा विकास होत आहे तर तुमच्या पोटात का दुखत आहे ? लवासा प्रकल्पावेळी तुमचे वृक्षप्रेम, निसर्गप्रेम कुठे गेले होते ? असे प्रश्न उपस्थित करून आमदार सचिन कल्ल्यानशेट्टी यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर सडकून टीका केली.
Post Views: 19