बदनापूर :कर्ज दिले म्हणून महिलांच्या सन्मानाशी खेळण्याचा परवाना मिळाला
काय? कर्जाच्या हप्त्यांच्या वसुलीसाठी महिलांना धमकावणे, अपमानास्पद
भाषा वापरणे आणि सार्वजनिक ठिकाणी बदनामी करणे, असे प्रकार आता खपवून
घेतले जाणार नाहीत, असा आक्रमक इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख रूपम रमेश घुगे यांनी दिला आहे.
मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या वसुली प्रतिनिधींकडून महिलांना होत
असलेल्या कथित मानसिक त्रासाविरोधात त्यांनी तहसीलदारांना निवेदन सादर
केले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख मनिष श्रीवास्तव, जिल्हा संघटक भानुदास घुगे
यांच्यासह शिवसेना पदाधिकार्यांची प्रमुख उपस्थिती होती. बदनापूर
तालुक्यातील अनेक महिलांनी विविध मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्ज
घेतले आहे. मात्र, कर्जाचे हप्ते वसूल करण्यासाठी संबंधित कंपन्यांचे
प्रतिनिधी महिलांच्या घरी जाऊन दबाव टाकत असल्याच्या, अपमानास्पद भाषा
वापरत असल्याच्या तसेच धमकावून मानसिक त्रास देत असल्याच्या तक्रारी समोर
येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. काही महिलांची सार्वजनिक
ठिकाणी बदनामी केली जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
कर्जवसुलीच्या नावाखाली महिलांचा सन्मान पायदळी तुडवण्याचा अधिकार
कोणालाही नाही.कर्जाची परतफेड करण्याची जबाबदारी असली, तरी वसुलीच्या
नावाखाली महिलांना अपमानित करणे, धमकावणे किंवा मानसिक छळ करणे चुकीचे
आहे. रिझर्व्ह बँकेच्या वसुलीविषयक नियमांचे उल्लंघन करणार्या
प्रतिनिधींवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी घुगे यांनी केली.
निवेदनातून महिलांना धमकावणे व अपमानित करणे तात्काळ थांबविण्याचे आदेश
संबंधित कंपन्यांना द्यावेत, बेकायदेशीर व सक्तीच्या वसुली पद्धतींवर
कारवाई करावी, तालुकास्तरावर तक्रार निवारण यंत्रणा निर्माण करावी,
नियमांचे उल्लंघन करणार्या प्रतिनिधी व कंपन्यांवर कायदेशीर कारवाई
करावी तसेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासनाला आवश्यक सूचना
द्याव्यात, अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.
महिलांच्या सन्मानासाठी शिवसेना रस्त्यावर उतरणार!
प्रशासनाने या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेऊन पीडित महिलांना न्याय
द्यावा. अन्यथा महिलांच्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब
ठाकरे) पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा
निवेदनातून देण्यात आला आहे. या निवेदनावर जिल्हाप्रमुख मनिष श्रीवास्तव,
जिल्हा संघटक भानुदासनाना घुगे, महिला जिल्हाप्रमुख रुपम घुगे यांच्यासह
राजेंद्र जर्हाड, राहुल जर्हाड, अनिस पठाण, पद्माकर पडूळ, रामेश्वर फड,
फैजान मिर्झा, बळीराम कोल्हे, रामराव अंभोरे, रामेश्वर फड, पद्माकर
जर्हाड, भाऊसाहेब ढाकणे आदींच्या स्वाक्षर्या आहेत. कर्जाच्या
वसुलीपेक्षा महिलांचा सन्मान मोठा आहे, याची जाणीव मायक्रो फायनान्स
कंपन्यांनी ठेवावी, अशी ठाम भूमिका महिला आघाडीने मांडली आहे.
००००००००००
फोटो अोळी……
६- मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या वसुली प्रतिनिधींकडून महिलांना होत
असलेल्या कथित मानसिक त्रासाविरोधात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देतांना शिवसेना
जिल्हाप्रमुख मनिष श्रीवास्तव, जिल्हा संघटक भानुदास घुगे, महिला
जिल्हाप्रमुख रुपम घुगे आदी.






















