पंढरपूर – महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी पंढरीत दररोज हजारो भाविक दाखल होत असतात. मात्र या भाविकांचे स्वागत नेहमीच वाहतूक कोंडीनेच होत असल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे. शहरातील प्रमुख चौकांसह मंदिर परिसर , शहरातील प्रमुख नगरप्रदक्षिणा मार्ग, शहरातील अन्य प्रमुख मार्गां बरोबरच पंढरपुरात प्रवेश करणाऱ्या मुख्य मार्गांवर देखील सातत्याने वाहतुकीची कोंडी होत असल्याने भाविक, स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
पंढरपूर हे राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र असल्याने शहरातील वाढती भाविकांची संख्या आणि वाहतुकीचा ताण लक्षात घेऊन अलीकडेच पोलीस प्रशासनात अप्पर पोलीस अधीक्षक पदाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र, प्रशासकीय स्तरावर यंत्रणेचा विस्तार होत असतानाही शहरातील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे वाहतूक शाखेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
दरम्यान शनिवार, रविवार आणि त्याला लागून आलेल्या सुट्यांच्या काळात तर शहरात प्रवेश करणाऱ्या प्रमुख मार्गांवरही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने भाविकांना तासन्तास वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागत आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांना शहरातील दिशादर्शक फलक नसल्याने मोठी तारांबळ उडते. त्याचबरोबर शहरात पार्किंग व्यवस्था आणि वाहतुकीच्या नियोजनाअभावी मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी ही पंढरपूरकरांच्या पाचवीलाच पुजली असल्याचे एकंदर पोलिस प्रशासनाच्या विशेषत: वाहतूक शाखेच्या कामकाजावरुन जाणवत आहे.
————————
चौकट : ( यात्रेच्या तोंडावर नियोजनाची गरज )
आगामी कार्तिकी यात्रेला अवघे काही दिवस शिल्लक असताना पंढरपुरात भाविकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत सध्याची वाहतूक व्यवस्था कायम राहिल्यास यात्राकाळात परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वाहतूक पोलिसांकडून यात्रेच्या अगोदर वाहतूक नियंत्रण सुरळीत रहावे यासाठी जाणीवपुर्वक नियोजन करण्याची गरज आहे.
———————–
चौकट : ( कायमस्वरुपी वाहतूक कोंडीची ठिकाणे )
सरगम चौक, उपविभागीय पोलीस कार्यालयासमोरील रस्ता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पंढरपूर अर्बन बँक कॉर्नर, नगरपालिका इमारत परिसर, भादुले चौक परिसर, महात्मा फुले चौक, अहिल्यादेवी पुतळा चौक, गजानन महाराज मठासमोरील परिसर अशा प्रमुख ठिकाणी वारंवार वाहतुकीची कोंडी होत आहे.
——————–
चौकट : (कायम स्वरुपी उपाय योजना आवश्यक )
वाहतूक कोंडी होणाऱ्या प्रमुख चौकांमध्ये कायमस्वरूपी वाहतूक पोलीस तैनात करणे, एकेरी मार्गांची प्रभावी अंमलबजावणी, अवजड वाहनांना शहराबाहेरून पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे, वाहनतळांची व्यवस्था आणि गर्दीच्या वेळेत अतिरिक्त पोलिसबळ तैनात करणे अशा उपाययोजना कायमस्वरूपी करणे आवश्यक आहे.
———————
चौकट : ( उंटावरुन शेळ्या राखण्याचा प्रयत्न )
पंढरीत पोलिस प्रशासनाकडून उंटावरून शेळ्या राखल्या जात असून गेल्या काही दिवसांपासून स्टेशन रोड परिसरात गर्दीच्या ठिकाणी सायरन वाजवत पोलिसांची गाडी येते आहे. या गाडीमधूनच वाहतूक कोंडी दूर करण्याचा प्रयत्न होत असल्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
Views: 9