सोलापूर : हिवाळी अधिवेशनानंतरही संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांवर ठोस कारवाई न झाल्यास महापालिकेच्या सभेत आकुलवार यांना बडतर्फ करण्याची मागणी आणि आयुक्त हटावचा ठराव मांडण्याबाबत पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा करणार आहे. महापालिकेच्या नालेसफाई कामातील कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी गेल्या पाच महिन्यांपासून पाठपुरावा सुरू असतानाही
तत्कालीन नगर अभियंता सारिका आकुलवार यांना पुन्हा नगर अभियंतापदाची जबाबदारी दिल्यास आपण नगरसेवकपदाचा राजीनामा देऊ, असा इशारा तक्रारदार तथा भाजपचे नगरसेवक अनंत जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिला
सोलापूर महापालिकेतील नालेसफाई कामातील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाची सुरुवात सोलापूर महापालिका सर्वसाधारण सभेत लक्षवेधीपासून झाली. त्यानंतर सादर केलेले व्हिडिओ पुरावे, चौकशी समितीचा अहवाल आणि १९ कर्मचाऱ्यांवरील ठपका या माध्यमातून प्रकरण पुढे आले. आता आ. विजयकुमार देशमुख, आ. सुभाष देशमुख आणि आ. देवेंद्र कोठे यांनी हिवाळी अधिवेशनासाठी तारांकित प्रश्न उपस्थित केले आहेत. महापालिका प्रशासनानेही या प्रश्नांच्या अनुषंगाने शासनाला माहिती पाठविली आहे. या तिन्ही लोकप्रतिनिधींचे जाधव यांनी आभार मानले.
आयुक्तांनी २० नोव्हेंबर रोजी दिलेल्या निर्देशानुसार पोकलेनच्या बिलांची फेरतपासणी करण्यात आली. मोठ्या बूम पोकलेनच्या दोन कोटी ११ लाख रुपयांच्या नोंदविलेल्या बिलापैकी सुमारे ९० लाख रुपये देय असल्याचे तपासणीत समोर आल्याचा दावा जाधव यांनी केला. यामुळे सुमारे एक कोटी २१ लाख रुपयांची तफावत निदर्शनास आली आहे. टिप्परच्या बिलांमध्ये आणखी ५० ते ६० लाख रुपयांची तफावत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. एकूण सुमारे तीन कोटी रुपयांची संभाव्य बचत झाली आहे. मात्र मशिनच्या कामाच्या तासांची कपात करण्यासाठी निश्चित तांत्रिक आधार आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्याला पदावरून दूर करून फौजदारी गुन्हा दाखल करावा, विभागीय चौकशीला गती द्यावी आणि कंत्राटदाराकडून अतिरिक्त रकमेची वसुली करावी अशी मागणी करत चौकशी सुरू असताना संबंधित अधिकाऱ्यांकडे चार विभागांची जबाबदारी सोपविण्याबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली.
मोठ्या पोकलेनच्या बिलात १.२१ कोटींची तफावत
मोठ्या पोकलेनसाठी २ कोटी ११ लाख ३८ हजार रुपयांचे बिल नोंदविण्यात आले. मात्र, तपासणीनुसार ९० लाख १८ हजार ८८० रुपयेच देय अपेक्षित असल्याने तब्बल १ कोटी २१ लाख १९ हजार १२० रुपयांची तफावत निदर्शनास आली आहे. ही रक्कमही अंतिम नसून बिलाची फेरतपासणी आवश्यक असल्याचे नगरसेवक अनंत जाधव यांनी सांगितले.
तीन कोटींची बचत, तासांच्या फेरतपासणीची मागणी
मोठ्या पोकलेन आणि लहान बूमच्या बिलांमध्ये एकूण सुमारे २ कोटी २९ लाख ४७ हजार रुपयांची तफावत आहे. टिप्परच्या भाड्यातील आणखी ५० ते ६० लाखांची कपात अपेक्षित असल्याने महापालिकेचे सुमारे तीन कोटी रुपये वाचू शकतात. मशिनचे कामाचे तास केवळ ३० टक्के कपात न करता उत्पादक कंपन्यांकडून तांत्रिक माहिती घेऊन निश्चित करावेत, अशी मागणी नगरसेवक जाधव यांनी केली आहे.
———–
Views: 23