सोलापूर : देशाच्या सीमेवर अहोरात्र कर्तव्य बजावून देशवासीयांचे रक्षण करणाऱ्या भारतीय जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स, सोलापूरच्या वतीने ‘एक राखी सैनिकांसाठी’ हा उपक्रम राबविण्यात आला. राखी पौर्णिमेच्या निमित्ताने विद्यार्थिनींनी तब्बल ५०० राख्या भारतीय जवानांसाठी पाठवून वीर सैनिकांना प्रेम, सन्मान आणि कृतज्ञतेची अनोखी सलामी दिली.
विद्यार्थ्यांमध्ये सैनिकांविषयी आदरभाव निर्माण व्हावा, देशसेवेची जाणीव दृढ व्हावी आणि सीमेवर तैनात असलेल्या जवानांशी भावनिक नाते निर्माण व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत प्रेम आणि देशभक्तीच्या भावनेतून राख्या जमा केल्या.
‘राखीचा हा धागा… कृतज्ञतेचा, सन्मानाचा आणि प्रेमाचा!’ या भावनेतून पाठविण्यात आलेल्या राख्या म्हणजे सीमेवर तैनात असलेल्या जवानांच्या त्यागाला विद्यार्थिनींनी दिलेली भावनिक मानवंदना ठरली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सत्यजित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. ज्युनिअर विभागाचे समन्वयक तथा मराठी विषयप्रमुख प्रा. अजित देवसाळे, उपप्राचार्य बी. आर. पाटील, प्रा. अमोल कस्तुरे आणि प्राध्यापिका शिरीषा कुडल यांनी उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.
राख्या पाठविण्यासाठी सोलापूर मुख्य पोस्ट ऑफिसचे वरिष्ठ डाकपाल काळे सोमनाथ, सहाय्यक डाकपाल सौ. कांबळे एम. ए., डाकपाल सहाय्यक मंगेश सुरवसे, हरीश केदार, सौ. श्वेता बेऊर, रवींद्र पाळवदे आदींनी सहकार्य केले.
सीमेवर तैनात असलेल्या जवानांपर्यंत हा राखीचा धागा पोहोचून त्यांच्या मनातही आपुलकीची भावना निर्माण होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. सोलापूरच्या विद्यार्थिनींनी पाठविलेल्या ५०० राख्या म्हणजे भारतीय जवानांच्या शौर्याला आणि त्यागाला वाहिलेली प्रेमाची कृतज्ञ सलामी ठरली.
Post Views: 16