माळशिरस – आषाढी वारी निमित्त दिनांक १९ जुलै रोजी धर्मपुरी येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे आगमन होणार आहे. माळशिरस पंचायत समिती अंतर्गत धर्मपुरी, कारंडे, मोरोची, मांडवे, सदाशिवनगर, पुरंदावडे, येळीव, पाणीवपाटी, खुडूस, विजोरी, पिसेवाडी, वेळापूर, ठाकूर बुवा उघडेवाडी, तोंडले या गावांमध्ये पालखीचे विसावे असून वेळापूर येथे २१ जुलै रोजी मुक्काम आहे. तसेच श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दिनांक २० जुलै रोजी आपल्या तालुक्यात आगमन होत असून अकलूज येथे मुक्काम आहे. ही पालखी यशवंतनगर, संग्रामनगर, माळीनगर, सवतगव्हाण, तांबवे, लवंग, बोरगाव, माळखांबी बोंडले येथून दसुर मार्गे पंढरपूर तालुक्यात दिनांक २२ जुलै रोजी मार्गस्थ होईल.

पाच रिंगण सोहळे
सदाशिवनगर पुरंदावडे येथे पालखीचे गोल रिंगण, खुडूस येथे रिंगण व ठाकूर बुवा येथे उभे रिंगण होणार आहे. श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे अकलूज येथे गोल रिंगण व माळीनगर येथे उभे रिंगण आहे.
ग्रामपंचायतीच्या वतीने स्वस्चातेची कामे
सदर दोन्ही पालखीच्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी व सोयीसाठी वरील सर्व ग्रामपंचायत मध्ये स्वच्छता करणे, गटर साफ करणे, पाणी शुद्धीकरण करणे, जंतुनाशक पावडर इत्यादी स्वच्छतेच्या सुविधा व पिण्याचे शुद्ध पाणी पुरवठा केला जाणार आहे. सध्या सर्व गावांमध्ये स्वच्छतेची कामे सुरू आहेत.
तसेच पावसाळ्याचे दिवस असल्याने चिखल होऊ नये म्हणून आवश्यक ठिकाणी मुरूम पसरणे व काटेरी झाडे झुडपे तोडणे. दिवाबत्तीची सोय करणे व वारकऱ्यांना मूलभूत सुविधा पुरविणे ही कामे केली जाणार आहेत
स्वागत कमानी
पालखीच्या स्वागतासाठी प्रत्येक ठिकाणी स्वागत कमानी व स्वागत मंडप यांची उभारणी करण्यात येणार आहे तसेच प्रत्येक ठिकाणी वारकरी सुविधा केंद्र. ए ओ सी सेंटर, आरोग्य तपासणी केंद्र, हिरकणी कक्ष, मसाज सेंटर इत्यादी सुविधा पुरविण्यात येणार आहेत .
जर्मन हँगर मंडप, वॉटरप्रूफ मंडप
जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालखी मुक्कामाच्या ठिकाणी बोरगाव, सदाशिवनगर, वेळापूर, येथे जर्मन हँगर मंडप उभारले जाणार आहेत. तसेच वॉटरप्रूफ मंडप उभारले जाणार आहेत. गावोगावी वारकऱ्यांसाठी आंघोळीची सोय स्नानगृहे तसेच शौचालय उभारण्यात येणार असून पाणीपुरवठ्यासाठी टँकरची सोय करण्यात आली आहे. सदर टँकर टँकर फीडिंग पॉईंट वर भरले जाणार आहेत.
विद्युत रोषणाई
मुक्कामाच्या ठिकाणी विद्युत रोषणाई व मोठ्या प्रमाणात प्रकाश व्यवस्था करण्यात येणार आहे.
दिनांक 22 जुलै रोजी संतांच्या सर्व पालख्या आपल्या माळशिरस तालुक्यातून पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहेत.
दोन्ही पालख्यांचा पालखी सोहळा यशस्वी होण्यासाठी प्रशासनाने 100% तयारी केली आहे.




















