सोलापूर – आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकऱ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि खड्डेमुक्त करण्यासाठी शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सोलापूर जिल्ह्यातील पालखी मार्गावरील १६ रस्त्यांच्या विशेष दुरुस्ती व सुधारणेसाठी तब्बल २ कोटी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, ही सर्व कामे चालू आर्थिक वर्षात पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
ग्रामविकास विभागाच्या २५ जूनच्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदेने सादर केलेल्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या निधीतून पालखी मार्गावरील खराब झालेल्या रस्त्यांची विशेष दुरुस्ती, डागडुजी आणि आवश्यक सुधारणा करण्यात येणार आहेत. त्यामुळे आषाढी वारीदरम्यान लाखो वारकऱ्यांना सुरक्षित व अधिक सोयीस्कर प्रवासाचा लाभ मिळणार आहे.
दरम्यान, या योजनेअंतर्गत माळशिरस, करमाळा, पंढरपूर आणि माढा तालुक्यांतील महत्त्वाच्या पालखी मार्गांचा समावेश करण्यात आला आहे. विशेषतः पंढरपूर तालुक्यातील आठ प्रमुख रस्त्यांच्या दुरुस्तीला प्राधान्य देण्यात आल्याने वारीच्या मुख्य मार्गावरील वाहतूक अधिक सुरळीत होण्याची अपेक्षा आहे.
चौकट
पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील प्रस्तावित रस्ते
करकंब,भोसे,विष्णूपद,वाखरी,पिरा
तसेच इतर पालखी मार्गावरील जोडरस्ते तर माळशिरस तालुक्यात दहिगाव–शिंगणापूर पाटी, नातेपुते–जगतवस्ती, मांडवे–नातेपुते (जुना पालखी मार्ग), करमाळा तालुक्यात रावगाव–करमाळा व सातोली–चिखलवाडी या रस्त्यांचाही समावेश आहे.
चौकट
पालखी मार्ग होणार खड्डेमुक्त
‘वारीपूर्वी पालखी मार्ग खड्डेमुक्त करण्यावर शासनाचा भर’ या निर्णयामुळे वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसह ग्रामीण भागातील नागरिकांनाही वर्षभर चांगल्या रस्त्यांचा लाभ मिळणार आहे. पालखी मार्गावरील पायाभूत सुविधा मजबूत करण्याच्या दृष्टीने हा निधी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.




















