सोलापूर : महापालिकेच्या प्रशासकीय काळात झालेल्या नालेसफाईच्या कंत्राटात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप भाजपचे नगरसेवक अनंत जाधव यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित मक्तेदार व दोषी अधिकाऱ्यांवर अपहाराचा गुन्हा दाखल करावा, तसेच शासनाच्या पैशाची वसुली करावी, अशी मागणी त्यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. २० जुलै रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत यासंदर्भात लक्षवेधी मांडणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, प्रशासकीय काळात नालेसफाईचे काम रणजीत टूर्स अँड ट्रॅव्हल्स या मक्तेदाराला देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्ष कामाची शहानिशा न करता मक्तेदाराने सादर केलेल्या बिलांवर संबंधित अधिकाऱ्यांनी सह्या करून ती पुढे पाठवली. या प्रक्रियेत मोठी आर्थिक तफावत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आपण आयुक्तांकडे लेखी तक्रार केली होती. या तक्रारीनंतर संबंधित मक्तेदाराची प्रलंबित बिले थांबविण्यात आल्याचे सांगत जाधव म्हणाले की, सुमारे १ कोटी ८० लाख रुपयांचे बिल अदा झाले असून आणखी दीड ते दोन कोटी रुपयांची बिले प्रलंबित आहेत. संपूर्ण प्रकरणात किमान एक ते दीड कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा संशय असून महापालिका प्रशासनाकडून सुमारे ५० लाख रुपयांच्या वसुलीची तयारी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
भ्रष्टाचाराची पद्धत स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, पोकलेन, जेसीबी आणि डंपर यांसारख्या यंत्रसामग्रीच्या वापरासाठी १६ ते २२ तासांचे काम दाखवून प्रतितास ४,८०० रुपये दराने बिले सादर करण्यात आली. मात्र महापालिकेच्या एसएसआर/डीएसआरनुसार हा दर सुमारे २,६०० ते २,८०० रुपये इतकाच आहे. त्यामुळे प्रत्येक तासामागे सुमारे दोन हजार रुपयांहून अधिक रक्कम जादा अदा करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. आठही झोन आणि मुख्य कार्यालयातील बिलांची तपासणी केल्यास कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार उघड होईल, असा दावा त्यांनी केला.
आयुक्तांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून महापौर, सभागृह नेते आणि सत्ताधारी पक्षही यावर लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी सांगितले. दोषी आढळणाऱ्यांकडून शासनाच्या पैशाची वसुली होईल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी २० जुलैच्या सर्वसाधारण सभेत लक्षवेधीच्या माध्यमातून हा विषय सभागृहात मांडणार असल्याचे जाहीर केले.
सत्ताधारी भाजपचा नगरसेवक असूनही भ्रष्टाचाराविरोधात भूमिका घेत असल्याबाबत विचारले असता जाधव म्हणाले, भारतीय जनता पक्षाचे सरकार कोणत्याही भ्रष्टाचाराला पाठीशी घालत नाही. जनतेच्या कराच्या पैशांचा अपहार होत असेल तर तो रोखणे ही लोकप्रतिनिधी म्हणून आमची जबाबदारी आहे. चांगल्या कामाचे कौतुक करू मात्र चुकीच्या कामाला कोणालाही पाठीशी घालणार नाही.
—-
Post Views: 6