लाल बावटा आशा वर्कर्स संघटनेतर्फे कारवाईची मागणी
सोलापूर : महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या वतीने राज्यभरात अल्पवयीन माता शोधण्याचे व त्यावर नियंत्रण आणण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, या मोहिमेत कार्यरत असलेल्या आशा वर्कर्स, आरोग्य सेविका आणि इतर कर्मचाऱ्यांना धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप करत
संबंधितांवर गुन्हा दाखल करावा. नावे गोपनीय ठेवण्यात यावी अशी मागणी लाल बावटा आशा वर्कर्स संघटनेतर्फे महापालिका आरोग्य अधिकारी यांच्याकडे केली आहे.
राज्य शासनाने अल्पवयीन मातांच्या घटनांवर निर्बंध आणण्यासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याअंतर्गत आशा सेविका व आरोग्य कर्मचारी माहिती संकलनाचे काम करत आहेत. मात्र, नावासह माहिती गोपनीय ठेवणे बंधनकारक असतानाही काहींकडून संबंधित अल्पवयीन मातांच्या कुटुंबीयांपर्यंत माहिती पोहोचविली जात असल्याची माहिती समोर आली.
यामुळे अनेक ठिकाणी आशा सेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. काही भागांत अल्पवयीन माता आढळून आल्यानंतर काही व्यक्तींनी आशा वर्कर्सना धमकीचे फोन केल्याचे समोर आले आहे. तसेच अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून मानसिक दबाव टाकण्याचाही प्रकार घडत असल्याची माहिती आशा सेविकांनी दिली.
या पार्श्वभूमीवर आरोग्य सेविका व त्यांच्या प्रतिनिधींनी महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांची भेट घेऊन अशा धमक्या देणाऱ्या व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणार असल्याचे सांगितले. तसेच क्षेत्रात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करण्याचीही मागणी यावेळी करण्यात येणार आहे. आरोग्य विभागाच्या या मोहिमेमुळे अल्पवयीन मातांच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यास मदत होत असली तरी, प्रत्यक्ष क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, आशा वर्कर्स व संबंधित कर्मचाऱ्यांकडून अल्पवयीन मातांची नोंदणी केली जाते. ती माहिती वरिष्ठांना दिली जाते. या संदर्भातील नावे गोपनीय ठेवली जातात. या प्रकरणातील कुटुंब आणि आशा वर्कर्स यांची नावे बाहेर उघड झाल्याने संबंधित नातेवाईकांकडून काही आशा वर्कर्सना दमदाटी व धमक्या दिल्या जात आहेत असा आरोप करत लाल बावटा आशा वर्कर संघटनेच्या जिल्हा सचिव पुष्पा पाटील यांनी याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत. आशा वर्करची नावे गोपनीय ठेवण्यात यावीत, अशी मागणी केली आहे.
Post Views: 11