अक्कलकोट – तालुक्यातील शेती व ग्रामीण भागातील वीजपुरवठा अधिक सक्षम आणि सुरळीत करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून, महापारेषणच्या नवीन 132 के.व्ही./ 33 के.व्ही. क्षमतेच्या मैंदर्गी अतिउच्चदाब उपकेंद्रास तत्त्वतः मंजुरी मिळाली आहे. ही माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली.
या उपकेंद्राच्या उभारणीनंतर 33 के.व्ही./ 11 के.व्ही. दुधनी, मैंदर्गी, बोरोटी व मिरजगी उपकेंद्रांवरील भार कमी होण्यास मदत होणार असून, शेतीपंपांसह ग्रामीण भागातील वीजपुरवठा अधिक स्थिर व गुणवत्तापूर्ण होणार आहे. विशेषतः वारंवार होणारे कमी दाबाचे प्रश्न, तांत्रिक अडचणी आणि खंडित वीजपुरवठ्याच्या समस्यांमध्ये लक्षणीय घट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.या प्रकल्पामुळे अक्कलकोट तालुक्यातील एकूण 52 गावांना थेट लाभ मिळणार असून, शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असलेला नियमित वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे. परिणामी कृषी उत्पादनवाढीस चालना मिळून ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळेल.
प्रतिक्रिया,
अक्कलकोट तालुक्यातील शेतकरी व नागरिकांना दर्जेदार आणि अखंडित वीजपुरवठा मिळावा, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. मैंदर्गी अतिउच्चदाब उपकेंद्राला मिळालेली मंजुरी हा तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा असून, यामुळे ५२ गावांतील वीजविषयक अडचणी मोठ्या प्रमाणात कमी होतील. शेतकरी आणि ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यास माझे प्राधान्य कायम राहील.
सचिन कल्याणशेट्टी
आमदार, अक्कलकोट