सोलापूर : महापालिकेच्या आठही विभागीय कार्यालयांतर्गत नाला सफाई मोहिमेची सुरू आहे. शहरातील सुमारे ७० ते ८० टक्के नाला सफाई पूर्ण झाली असून उर्वरित कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. पावसाळ्यात नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कामे करावी
पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याचे निर्देश महापौर विनायक कोंड्याल दिले.
आगामी पावसाळ्यात शहरात पाणी साचण्याच्या समस्या टाळण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने कंबर कसली असून शहरातील ७४ नाले, प्रस्तावित १९ नाला विकास प्रकल्प आणि सुरू असलेल्या नाला सफाई कामांचा महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली सविस्तर आढावा घेण्यात आला.
महानगरपालिकेच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात झालेल्या बैठकीस उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते, नगरसेविका सौ. रोहिणी तडवळकर, आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर अभियंता सारिका आकुलवार, प्रकाश दिवाणजी यांच्यासह १ ते ८ विभागीय अधिकारी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत शहरातील सर्व ७४ नाल्यांची सद्यस्थिती, वहन क्षमता, नाला सफाईची प्रगती आणि पावसाळ्यापूर्वी आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. याशिवाय प्रस्तावित १९ नाला विकास प्रकल्पांच्या कामांची स्थिती आणि पुढील नियोजनावरही चर्चा झाली.
महापालिकेच्या आठही विभागीय कार्यालयांतर्गत सुरू असलेल्या नाला सफाई मोहिमेची माहिती अधिकाऱ्यांनी सादर केली. त्यानुसार शहरातील सुमारे ७० ते ८० टक्के नाला सफाई पूर्ण झाली असून उर्वरित कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याचे निर्देश महापौरांनी दिले.
पजवणी मार्केट, मुळेगाव नाका आणि अक्कलकोट रोडवरील मुद्रा सन सिटी परिसरात मागील पावसाळ्यात पाणी साचल्याच्या घटनांची विशेष दखल बैठकीत घेण्यात आली. या भागांतील जलनिस्सारण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.
महापौर कोंड्याल यांनी सर्व ७४ नाल्यांची नियमित पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी तातडीने उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिल्या. तसेच पावसाळ्यात नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले.
नाला सफाईची स्थिती
शहरातील एकूण नाले : ७४
प्रस्तावित नाला विकास प्रकल्प : १९
नाला सफाई पूर्ण : ७० ते ८० टक्के
उर्वरित कामे : युद्धपातळीवर सुरू
संवेदनशील भाग : पजवणी मार्केट, मुळेगाव नाका, मुद्रा सन सिटी
Post Views: 4