सोलापूर : नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (नॅब) संचलित सोलापूर येथील चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशाला, राजीव गांधी मेमोरियल स्कूल फॉर द ब्लाइंड आणि ममता मूकबधिर विद्यालय या संस्थांच्या वतीने भव्य आषाढी वारी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. विठ्ठलनामाचा गजर आणि टाळ-मृदंगाच्या निनादाने संपूर्ण नॅब संकुल भक्तीमय झाले.
या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेषात दिंडी व भक्ती रिंगण सादर करत साक्षरता, ‘बेटी बचाव-बेटी पढाव’, स्त्री-सन्मान आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. मनपा उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, माजी प्राचार्य नरसिंह आसादे, पद्माकर कुलकर्णी, आसावरी सराफ आणि नॅबचे जनरल सेक्रेटरी शशीभूषण यलगुलवार यांच्या हस्ते पालखी पूजन व वृक्षारोपण करण्यात आले. विशेष मुलांच्या उत्स्फूर्त सहभागाने रंगलेला आणि भक्तीसोबत सामाजिक बांधिलकी जपणारा हा सोहळा अत्यंत प्रेरणादायी ठरला.