वैराग – सोलापूर जिल्ह्यातील वैराग शहरातील खेंदाड गल्ली (लक्ष्मीचे कुरण) परिसरात मंगळवारी पहाटेच्या सुमारास एक अत्यंत हृदयद्रावक आणि भीषण दुर्घटना घडली. जुन्या व जीर्ण झालेल्या घराची भिंत अचानक कोसळल्याने ढिगाऱ्याखाली दबून मावशी आणि भाचीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण वैराग शहरासह खेंदाड गल्ली परिसरात तीव्र शोककळा पसरली आहे.
नेमकी दुर्घटना कशी घडली?
मिळालेल्या माहितीनुसार, वैराग येथील लक्ष्मीचे कुरण परिसरात ठोंबरे कुटुंबीय वास्तव्यास आहेत. सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे जेवण आटोपून सर्व कुटुंबीय झोपले होते. घराच्या एका खोलीत मिना उर्फ मिलन गुलाब ठोंबरे (वय ५६, रा. खेंदाड गल्ली, वैराग) आणि त्यांच्या मावशी सुमन महादेव पारधे (वय ७६, रा. इंदिरानगर, वैराग) या दोघी झोपल्या होत्या. तर शेजारील दुसऱ्या खोलीत रामा गुलाब ठोंबरे, निशा गुलाब ठोंबरे व त्यांचा चिमुकला मुलगा वीर झोपलेले होते.
मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास सर्वजण गाढ झोपेत असताना, जुन्या घराची कमकुवत झालेली भिंत अचानक मोठा आवाज करत कोसळली. भिंतीचा जड आणि मोठा भाग थेट मिना आणि सुमन झोपलेल्या खोलीवर पडल्याने पत्रे तुटून त्या क्षणार्धात विटा-मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्या.
स्थानिकांची धावपळ अन् बचावकार्य
भिंत कोसळल्याचा प्रचंड आवाज होताच शेजारील खोलीत झोपलेले कुटुंबीय दचकून जागे झाले. त्यांच्या आक्रोसामुळे स्थानिक नागरिक आणि नातेवाईकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी कोणतीही वेळ न गमावता अत्यंत शर्थीचे प्रयत्न करून ढिगारा हटवला आणि ढिगाऱ्याखाली दबलेल्या दोघींना बाहेर काढले.
दोघींचीही प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने वैराग येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना पुढील तातडीच्या उपचारासाठी बार्शी येथील जगदाळे मामा रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. मात्र, दुर्दैवाने उपचारासाठी घेऊन जात असतानाच वाटेत त्यांची प्राणज्योत मालवली. सकाळी ८:०० वाजता रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
नशिबाने ३ जण थोडक्यात बचावले
या दुर्घटनेत मावशी-भाचीचा दुर्दैवी अंत झाला असला, तरी दुसऱ्या खोलीत झोपलेले रामा गुलाब ठोंबरे, निशा गुलाब ठोंबरे आणि त्यांचा मुलगा वीर हे तिघे सुदैवाने या भीषण दुर्घटनेतून थोडक्यात बचावले आहेत.
पोलीस ठाण्यात ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद
घटनेची माहिती मिळताच वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमुल कादबाने, पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव, पोलीस कॉन्स्टेबल उमेश कंगले व गणेश चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
या घटनेप्रकरणी वैराग पोलीस ठाण्यात अकस्मात मयत क्र. ६०/२०२६ (B.N.S.S. १९४) अन्वये नोंद करण्यात आली आहे. जगदाळे मामा रुग्णालय, बार्शी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. सावंत यांनी याविषयीची माहिती दिली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडणे करत आहेत.
जीर्ण आणि धोकादायक घरांचा प्रश्न ऐरणीवर
या हृदयद्रावक घटनेमुळे वैराग शहरातील जुनी, जीर्ण आणि धोकादायक घरे तसेच कमकुवत बांधकामांचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे समोर आला आहे. भविष्यात अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नगरपरिषद व स्थानिक प्रशासनाने शहरातील धोकादायक बांधकामांची तात्काळ पाहणी करून योग्य ती उपाययोजना करावी, अशी तीव्र मागणी स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे.
Post Views: 4