सांगोला – फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च, सांगोला येथील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ.संपतकुमार बोडापटला यांनी सोलापूर येथील इंजिनिअरिंग काॅलेज मध्ये आयोजित करण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित साहित्य, ऊर्जा आणि स्मार्ट तंत्रज्ञान या आंतरराष्ट्रीय परिषदेत सादर केलेल्या संशोधन पेपरला सर्वोत्कृष्ट संशोधन पेपर पुरस्कार मिळाला. त्यांनी शून्य प्रवाह शोध प्रणालीवर आधारित स्वयंचलित विद्युत शक्ती गुणक सुधारणा व स्थानिक संगणक जाळ्यावर स्वयं-आयोजित इंटरनेट ऑफ थिंग्ज निरीक्षण या विषयावर शोधनिबंध सादर केला होता. या संशोधनातून विद्युत शक्ती गुणक सुधारणा आणि आयओटीच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर विद्युत प्रणालीचे प्रभावी निरीक्षण करण्याच्या तंत्रज्ञानावर सविस्तर प्रकाश टाकण्यात आला. या यशाबद्दल संस्थचे सचिव डाॅ.अमित रूपनर यांनी डॉ.संपतकुमार बोडापटला यांचा सन्मान केला. याप्रसंगी प्राचार्य डाॅ.रविंद्र शेंडगे, उपप्राचार्या डाॅ.विद्याराणी क्षीरसागर, डाॅ.संजय आदाटे, प्रा.प्राजक्ता रूपनर, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.