वैराग – गौडगाव (ता. बार्शी) येथील एका शेतातील विहिरीत तुळजापूर येथील एका ३२ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्याने भागात खळबळ उडाली आहे. किरण राजेंद्र रोकडे (वय ३२, रा. वेताळ नगर, तुळजापूर) असे मृत तरूणाचे नाव आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून मिळालेल्या सिम कार्डच्या साहाय्याने तपास चक्रे फिरवून या तरुणाची ओळख पटवली आहे.
घटना कशी उघडकीस आली?
गौडगाव येथील रामचंद्र भड यांच्या शेतातील एका बांधलेल्या विहिरीमध्ये शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास हा मृतदेह तरंगताना आढळून आला. विहिरीच्या शेजारीच राहणाऱ्या एका महिलेला विहिरीत काहीतरी संशयास्पद तरंगताना दिसले. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर गावातील युवकांनी तातडीने वैराग पोलीस प्रशासनाला या घटनेची माहिती दिली.
माहिती मिळताच वैराग पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल संदेश पवार आणि उमेश उमाटे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह विहिरीच्या बाहेर काढण्यात आला. मात्र, सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटू शकली नव्हटी.
ओळख पटवण्यासाठी पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न
मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी आणि स्थानिक नागरिकांनी मृतदेहाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात यश आले नाही. त्यानंतर पोलीस कर्मचारी उमेश उमाटे यांनी शर्थीचे प्रयत्न करत, मृतदेहाजवळ सापडलेल्या मोबाईलमधील सिम कार्डच्या साहाय्याने नंबर ट्रेस केला.
या तांत्रिक तपासातून सदर व्यक्ती तुळजापूर येथील वेताळ नगरची असल्याचे समजले. पोलिसांनी तातडीने त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास रोकडे यांचे कुटुंबीय घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेहाची ओळख पटवली.
मृत्यूबाबत तर्क-वितर्क आणि गूढ वाढले
मिळालेल्या माहितीनुसार, किरण रोकडे हा सकाळी साडेनऊ वाजल्यापासून घरातून निघून गेल्याचे त्याच्या भावाने सांगितले. विशेष म्हणजे, दुपारी दीड वाजता किरणसोबत कुटुंबीयांचे बोलणे झाले होते. मात्र, त्यानंतर अवघ्या अडीच तासांत म्हणजेच दुपारी ४ वाजता त्याचा मृतदेह विहिरीत तरंगताना आढळल्याने या मृत्यूबाबत विविध तर्क-वितर्क काढले जात आहेत. अवघ्या अडीच तासांत नक्की काय घडले, याबाबत गूढ वाढले आहे.
पुढील कारवाई
घटनेची माहिती मिळताच वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनीही घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी बार्शी येथील शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. मृत किरण रोकडे याच्या पाठीमागे एक भाऊ आणि भावजय असा परिवार आहे. या घटनेची अधिकृत नोंद वैराग पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
Post Views: 35