अकलूज – माळशिरस तालुका हा जिल्ह्यात सर्वात जास्त पशुधन असलेला तालुका म्हणून ओळखला जातो. उद्या श्रावणी बैलपोळा असल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून अकलूज बाजारपेठेत बैलांच्या सजावटीच्या साहित्याची दुकाने सजली आहेत.
सध्या शेतकऱ्यांकडे पारंपरिक बैल-बारदाना कमी झाला असून दुभती जनावरे मोठ्या प्रमाणावर आहेत. मात्र बैलगाडा शर्यतीसाठी लागणारे खिल्लार खोंड जपणारा हौशी शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. या हौशी शेतकऱ्यांची आपल्या बैलांना सजवण्यासाठी खरेदीसाठी मोठी गर्दी दिसत आहे, तर दुसरीकडे मोलमजुरी करणारा मजूर वर्ग आपल्या दारातील गाय, शेळीसाठी बारीक कंडे, गोंडे घेताना दिसत आहे.
अकलूज नगरपालिकेने यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून दिली असून स्टॉल उभारण्यात आले आहेत. यामध्ये प्रसिद्ध व्यापारी वेळापुरे यांच्यासह अनेक लहान-मोठी दुकाने थाटली आहेत.
*किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ*
बाजारात नायलॉन दोरी, कासरे १०० रुपयांपासून ते २०० रुपये किलोपर्यंत विकले जात आहेत. रेशमी गोप, भोर कडी शेली, कवड्याची माळ, वेसणीसह शिंगाला लावण्यासाठी बेगड, हिंगोळ, रंग मोठ्या प्रमाणात विक्रीस आले आहेत. डिझेल दरवाढ आणि वाहतूक खर्च वाढल्याने सर्वच साहित्याच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
पाऊस नसल्याने आणि दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचा खरेदीकडे हात आखडता घेतल्याचे चित्र आहे.
“आमचा तीन-चार पिढ्यांपासून हा व्यवसाय आहे, मात्र यंदा सर्वात कमी विक्री झाली आहे. इंदापूर तालुक्यातील भाद्रपदी पोळा पुढील महिन्यात अमावस्येला असल्याने आम्ही ही दुकाने आणखी एक महिना ठेवणार आहोत,” अशी माहिती विक्रेते मयूर वेळापुरे यांनी दिली.
*प्लास्टर ऑफ पॅरिसच्या बैलजोडीला मागणी*
दरम्यान, विजय चौक येथे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या आकर्षक बैलजोडी विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर आल्या आहेत. कनेर, इस्लामपूर, मेडद, माळशिरस, सराटी आणि स्थानिक अकलूज येथून विक्रेते आले आहेत. लहान बैलजोडीपासून ते मोठ्या बैलगाडीसह बैलजोडी ५० रुपयांपासून ते ५०० रुपयांपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
“पूर्वी आम्ही मातीचे बैल बनवून त्याला रंगरंगोटी करून विकत होतो. आता शाडू आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या साच्यातून बैलजोडी तयार केली जाते. ग्राहक पूजेसाठी लहान-मोठ्या बैलजोडी हौसेने घेऊन जातात,” असे विक्रेते नवनाथ कुंभार यांनी सांगितले.
Post Views: 10