अक्कलकोट – शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण गृहप्रकल्प लवकरच साकार होणार आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजुरी मिळालेल्या सुमारे १,००० सदनिकांचा भव्य गृहप्रकल्प उभारण्याचे नियोजन करण्यात आले असून, या माध्यमातून गरजू कुटुंबांना अल्प किमतीत स्वतःच्या मालकीचे पक्के घर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.
आपल्या शहरातील गरजू नागरिकांना हक्काचे घर मिळावे यासाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आणि सुयोग्य प्रयत्नांना यश आले आहे. यासाठी केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री मनोहरलाल खट्टर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष सहकार्य लाभले आहे, असे कल्याणशेट्टी यांनी स्पष्ट केले आहे.
या प्रकल्पातील सदनिकांमध्ये हॉल, बेडरूम, किचन, संडास-बाथरूम तसेच बाल्कनी यांसारख्या आवश्यक सुविधांचा समावेश असणार आहे. शासनाच्या विविध योजनांचा समन्वय साधून केवळ घरकुलच नव्हे, तर लाभार्थ्यांना आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.पात्र लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळणार आहे. अमृत योजना आणि नगरोत्थान योजनेंतर्गत प्रकल्प परिसरात रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. याशिवाय आरडीएसएस योजनेतून आवश्यक विद्युत सुविधा व वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे.
घरासोबत रोजगारावरही भर
हा प्रकल्प केवळ घर उपलब्ध करून देण्यापुरता मर्यादित न ठेवता लाभार्थी कुटुंबांच्या आर्थिक सक्षमीकरणावरही भर देण्यात येणार आहे. कुटुंबातील सदस्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी कौशल्य विकास योजनेंतर्गत विविध क्षेत्रांतील प्रशिक्षण देण्याचे नियोजन आहे.सदर प्रकल्पाच्या नियोजन आणि मंजुरीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांचेही सहकार्य मिळाले आहे, असे कल्याणशेट्टी यांनी स्पष्ट केले आहे.
प्रतिक्रिया
“अक्कलकोट शहरातील कुटुंबांना पक्के घर, प्रत्येक हाताला कौशल्य आणि प्रत्येक कुटुंबाला आर्थिक स्थैर्य या उद्देशाने साकार होणारा हा १,००० सदनिकांचा गृहप्रकल्प अक्कलकोटमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आशेचा नवा किरण ठरणार आहे. घरासोबतच पायाभूत सुविधा, कौशल्य आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्यास अनेक कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडण्याची अपेक्षा आहे.”
सचिन कल्याणशेट्टी
आमदार, अक्कलकोट
Post Views: 9