कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे तीर्थक्षेत्र असलेल्या तुळजापूर येथील प्रस्तावित नवीन जिल्हा विश्रामगृहाच्या बांधकामाला गती मिळाली आहे. अत्याधुनिक, दर्जेदार आणि सर्व आवश्यक सुविधांनी सुसज्ज असे नवीन विश्रामगृह लवकरच साकारण्याचा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांनी दिल्या आहेत. याबाबत मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
तुळजापूर हे महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र असून श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी देशभरातून मोठ्या संख्येने भाविक येतात. तसेच मान्यवर, शासकीय अधिकारी आणि पर्यटकांचीही शहरात नियमित वर्दळ असते. या पार्श्वभूमीवर निवासाची सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी नवीन जिल्हा विश्रामगृह उभारण्यात येणार आहे.
प्रस्तावित विश्रामगृहाचे एकूण बांधकाम क्षेत्र सुमारे ३ हजार ३६६ चौरस मीटर असून इमारत जी+२ स्वरूपाची असणार आहे. प्रत्येक मजल्यावर निवासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.यात चार व्ही.व्ही.आय.पी,चार व्ही.आय.पी व चार सेमी .व्ही.आय.पी असे एकूण १२ सूट असणार आहेत.चाळीस व्यक्तींची बैठक व भोजन व्यवस्था असलेला सुसज्ज डायनिंग हॉल तसेच स्वतंत्र कॉन्फरन्स रूमची सुविधा देखील उपलब्ध असणार आहे.
या प्रकल्पासाठी सुमारे १६ कोटी ३४ लाख २९ हजार रुपये खर्च प्रस्तावित आहे. प्रकल्पाचा अंदाज तांत्रिक मान्यतेसाठी मुख्य अभियंता कार्यालयाकडे सादर करण्यात आला असून सध्या प्रकल्प नियोजनाच्या टप्प्यात असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.
नवीन विश्रामगृहाच्या बांधकामात गुणवत्तापूर्ण आणि पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करण्यावर भर देण्यात येणार आहे. इमारतीमध्ये फर्निचरसह आवश्यक अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. तसेच ऊर्जाबचतीच्या दृष्टीने सोलर पॅनेलची सुविधा उभारण्यात येणार असून संपूर्ण इमारतीसाठी सेंट्रलाइज्ड वातानुकूलित प्रणाली बसविण्याच्या सूचना मंत्री शिवेंद्रसिंह भोंसले यांनी दिल्या आहेत. मंत्रालयातील सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांच्या दालनात झालेल्या आढावा बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (बांधकाम) आबासाहेब नागरगोजे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. तांत्रिक प्रक्रिया तातडीने पूर्ण करून पुढील कार्यवाहीला गती देण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. तुळजापूरचे धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने असलेले महत्त्व लक्षात घेऊन नवीन विश्रामगृह सुरक्षित, आकर्षक आणि दर्जेदार असावे, यावरही बैठकीत विशेष भर देण्यात आला. बांधकामाच्या प्रत्येक टप्प्यावर गुणवत्तेची काटेकोर तपासणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. दरम्यान, तुळजापूरला येणाऱ्या भाविक व पर्यटकांची वाढती संख्या, शासकीय व प्रशासकीय गरजा आणि शहराचे धार्मिक महत्त्व लक्षात घेता या नवीन जिल्हा विश्रामगृहामुळे निवासाच्या सुविधेत मोठी भर पडणार आहे. आधुनिक सुविधांनी युक्त हे विश्रामगृह तुळजापूरच्या धार्मिक पर्यटनाला चालना देण्याबरोबरच शहरातील पायाभूत सुविधांना बळकटी देणारे ठरणार असल्याचे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.