सोलापूर – ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आणि वेळेत आरोग्यसेवा मिळावी, यासाठी आरोग्य केंद्रांमधील सुविधा, स्वच्छता आणि उपचार व्यवस्था सक्षम असणे आवश्यक आहे. याच दृष्टिकोनातून सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी अक्कलकोट तालुक्यातील जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन तेथील कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी केली. उपलब्ध आरोग्य सुविधांचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी केंद्रातील कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले, तसेच आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले.
यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) सूर्यकांत भुजबळ, गटविकास अधिकारी शंकर कवितके, गटशिक्षणाधिकारी प्रशांत आरबाळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विन करजखेडे, आरोग्य विस्तार अधिकारी भोरे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन मारकड, डॉ. आयेशा शेख आणि डॉ. बसवराज कोणदे यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या भेटीदरम्यान कुशल जैन यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील विविध विभागांची पाहणी केली. औषध विभागात उपलब्ध असलेल्या औषधसाठ्याची, ऑपरेशन थिएटरची तसेच रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या विविध सुविधांची माहिती घेतली. आरोग्य केंद्रामार्फत नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांचा आढावा घेत ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेची सद्यस्थिती जाणून घेतली.
ग्रामीण भागातील नागरिकांना किरकोळ आजारांपासून ते आवश्यक उपचारांपर्यंतच्या सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांनी रुग्णांना वेळेत उपचार, योग्य मार्गदर्शन आणि आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा, असे त्यांनी सूचित केले. रुग्णसेवा ही सर्वोच्च प्राथमिकता मानून आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तत्परतेने काम करावे, असे मार्गदर्शनही त्यांनी केले.
चौकट
सेवा संकल्प अभियानातून आरोग्यसेवेला बळ
सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शासकीय सेवांचा दर्जा उंचावणे आणि नागरिकांना योजनांचा लाभ प्रभावीपणे मिळवून देणे, हा प्रशासनाचा प्रयत्न आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य केंद्रांच्या कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी करून उपलब्ध सुविधांचा आढावा घेण्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्रातील पाहणीमुळे आरोग्य व्यवस्थेतील चांगल्या कामाची दखल घेण्याबरोबरच रुग्णसेवेचा दर्जा सातत्याने उंचावण्याचा संदेशही देण्यात आला.
Post Views: 4