सोलापूर – आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर ग्रामविकास व पंचायतराज विभागाने उभारलेल्या विविध सुविधा वारकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरत असून, विशेषतः ‘मुख्यमंत्री वारकरी निवारा केंद्र’ (जर्मन हॅंगर) वारकऱ्यांनी अक्षरशः हाऊसफुल केले आहे. ऊन, वारा आणि पावसापासून संरक्षण मिळत असल्याने हजारो वारकरी येथे विसावा घेत असून, मसाज सुविधा, हिरकणी कक्ष, पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहांचा मोठ्या प्रमाणात लाभ घेत आहेत..
राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी धर्मपुरी येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळाला भेट देऊन वारकऱ्यांशी आणि सोहळा प्रमुखांशी संवाद साधला. वारकऱ्यांच्या अडचणी, उपलब्ध सुविधा आणि आवश्यक सुधारणा याबाबत त्यांनी प्रत्यक्ष माहिती घेतली.
विशेष म्हणजे, मंत्रीपदाचा कोणताही बडेजाव न करता जयकुमार गोरे यांनी पालखीसोबत पायी चालत कारुंडे बंगला येथील माऊलींच्या विसाव्याच्या ठिकाणी भेट दिली. सोहळा प्रमुख अॅड. राजेंद्र उमाप यांच्यासमवेत जमिनीवर बसून प्रसाद ग्रहण केला आणि पालखी सोहळ्याच्या नियोजनावर चर्चा केली. संस्थानच्या वतीने त्यांचा महावस्त्र व प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, माजी आमदार राम सातपुते, जिल्हाधिकारी कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, विविध समित्यांचे पदाधिकारी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
चौकट
रेनकोटचे प्रातिनिधिक वाटप
ग्रामविकास विभागाच्या वतीने वारकऱ्यांना पावसाळी वारी लक्षात घेऊन प्रातिनिधिक स्वरूपात रेनकोटचे वाटप करण्यात आले. तसेच पालखी सोहळा प्रमुखांनाही रेनकोट व महावस्त्र देऊन गौरविण्यात आले.
चौकट
दहा पालखी मार्गांवर सुविधा
संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी मार्गासह राज्यातील दहा प्रमुख पालखी मार्गांवर ग्रामविकास विभागाने शौचालये, स्नानगृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मोबाइल चार्जिंग, मुख्यमंत्री आरोग्य रथ, मुख्यमंत्री वारकरी निवारा केंद्र, हिरकणी कक्ष आणि मसाज सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या सेवांसाठी प्रशिक्षित वारीदूतही नियुक्त करण्यात आले आहेत.
चौकट
मोबाइल आरोग्यसेवा ठरली प्रभावी
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेले मुख्यमंत्री आरोग्यदूत, जलदूत आणि वारीदूत हे उपक्रम वारकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहेत. मोटारसायकलवरून फिरणारे आरोग्यदूत वैद्यकीय किटसह पालखी मार्गावरच उपचार देत असल्याने थकलेल्या किंवा आजारी वारकऱ्यांना तत्काळ मदत मिळत आहे. या सेवांचे आरोग्य व शिक्षण सभापती चेतनसिंह केदार यांनीही निरीक्षण केले.
चौकट
स्वच्छता कामात तत्परता
पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, स्वच्छता आणि सुविधा अखंड सुरू राहाव्यात यासाठी विविध विभागांचे अधिकारी सातत्याने नियंत्रण ठेवून आहेत. पालखी पुढे सरकल्यानंतर मार्गाची स्वच्छता आणि सुविधा पूर्ववत करण्याचे कामही तत्परतेने सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले.
चौकट
वारकऱ्यांचा विश्वास जिंकणारी व्यवस्था
यंदाच्या आषाढी वारीत केवळ सुविधा उभारण्यापुरते न राहता त्या प्रत्यक्ष वारकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचाव्यात, यावर प्रशासनाने भर दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री वारकरी निवारा केंद्रापासून मोबाइल आरोग्यसेवेपर्यंतच्या उपक्रमांना वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, वारी अधिक सुरक्षित, सुसज्ज आणि सेवाभिमुख झाल्याचे चित्र पालखी मार्गावर पाहायला मिळत आहे.
Post Views: 34