सोलापूर – कागदावर दाखविलेली कामे प्रत्यक्षात किती झाली, खर्चाच्या तुलनेत त्याचा परिणाम किती साधला आणि योजनांची अंमलबजावणी नेमकी कशी झाली, याचा ‘अंदाज’ घेण्यासाठी विधिमंडळाची अंदाज समिती सोलापूर जिल्ह्यात दाखल झाली आहे. समितीच्या पहिल्याच आढावा बैठकीत आषाढी वारीतील औषध खरेदीचा मुद्दा चर्चेत आल्याने जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली. आता पुढील दोन दिवसांत प्रत्यक्ष स्थळपाहणी झाल्यास कागदावरील दावे आणि जमिनीवरील वास्तव यातील फरक उघड होण्याची शक्यता आहे.
जालन्याचे शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांच्या अध्यक्षतेखालील समिती तीन दिवसांच्या दौऱ्यावर आली आहे. गुरुवार पासून जिल्हा नियोजन भवनात जिल्हा परिषदेसह विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. समिती सदस्यांनी केवळ आकडेवारी स्वीकारण्याऐवजी विविध योजनांच्या खर्चामागील कारणे, कामांची सद्यस्थिती आणि त्याचा प्रत्यक्ष लाभ याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. त्यामुळे अनेक विभागप्रमुखांना आपल्या विभागाची कागदपत्रे आणि आकडेवारी तपासून उत्तरे द्यावी लागली.
समितीत विधानसभेचे २२ आणि विधान परिषदेचे पाच आमदार आहेत. यावेळी सुमारे दहा आमदार उपस्थित होते. शनिवारच्या संभाव्य स्थळपाहणीकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. आढावा बैठकीत विचारलेल्या प्रश्नांनंतर आता प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी समितीचा ‘अंदाज’ किती कठोर ठरतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
चौकट
औषध खरेदीचा ‘हिशेब’ चर्चेत
आषाढी वारीच्या काळात करण्यात आलेल्या औषध खरेदीवर समितीने प्रश्न उपस्थित केल्याचे समजते. उपलब्ध साठा, प्रत्यक्ष गरज, खरेदीचे प्रमाण आणि खर्च याबाबत विचारणा झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेतील खरेदी प्रक्रिया पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे.
चौकट
बंद दाराआड काय घडले?
समितीच्या दौऱ्याबाबत प्रशासनाने कमालीची गोपनीयता राखली आहे. पुढील दोन दिवसांत समिती कोणत्या ठिकाणी भेट देणार, कोणत्या विकासकामांची पाहणी करणार, याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनाही शेवटच्या क्षणी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक विभागांमध्ये कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू झाली आहे.