पंढरपूर – शहरातील यमाई तलावालगतची ३.१२ हेक्टर मोक्याची जागा नगरपरिषदेला विश्वासात न घेता श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या गोशाळा विस्तारासाठी देण्याच्या शासनाच्या निर्णयाविरोधात पंढरपूरचे राजकारण तापले आहे. या निर्णयाविरोधात विशेष सर्वसाधारण सभा आयोजित न केल्यास उच्च न्यायालयात दाद मागण्याचा स्पष्ट इशारा उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे, गटनेते वासुदेव बडवे, सुजितकुमार सर्वगोड व नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना एका पत्राद्वारे दिला आहे.
यमाई तलाव हा पंढरपूर शहराचा ‘ऑक्सिजन पार्क’ असून नागरिकांच्या, भाविकांच्या आणि शहराच्या आरोग्याच्या दृष्टीने त्याचे अस्तित्व टिकणे गरजेचे आहे. हा निर्णय रद्द करण्यासाठी उपनगराध्यक्षांसह २४ नगरसेवकांनी ३० जून २०२६ रोजी नगराध्यक्षांकडे विशेष सभेची मागणी केली होती. मात्र, महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम १९६५ मधील कलम ८१(२) नुसार १५ दिवसांत सभा बोलावणे बंधनकारक असतानाही २ महिने कोणतीही कारवाई झाली नाही.
त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने विशेष सभा न भरवल्यास थेट न्यायालयात लढा उभारण्याचा निर्णय माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, अॅड. सुनील वाळुजकर, अमोल डोके, सुजितकुमार सर्वगोड, विनायक संगीतराव व इतर सदस्यांनी घेतला आहे.
—————
चौकट : ( कायद्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप )
कलम ८१(३) नुसार जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करून १ महिना १२ दिवस उलटले तरी सभेचे आयोजन न झाल्याने कायद्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप उपनगराध्यक्षांसह इतर नगरसेवकांनी केला आहे.
—————
चौकट : ( जिल्हाधिकाऱ्यांना सात दिवसांचा अल्टीमेटम )
जिल्हाधिकाऱ्यांना ‘सात दिवसांचा अल्टिमेटम’ देण्यात आला आहे. तातडीने विशेष सभा न भरवल्यास थेट न्यायालयात लढा उभारण्याचा निर्णय माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, अॅड. सुनील वाळुजकर, अमोल डोके, सुजितकुमार सर्वगोड, विनायक संगीतराव व इतर सदस्यांनी घेतला आहे.
Post Views: 14