सोलापूर : राज्यातील काही भागांत निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश दिले आहेत. दुष्काळग्रस्त भागातील पिकांचे पंचनामे आजपासूनच सुरू करण्याचे आदेश महसूल प्रशासनाला देण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या मदतीची प्रतीक्षा न करता राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत करण्याची ग्वाही फडणवीस यांनी दिली.
याबाबतचा प्राथमिक शासन निर्णय (जीआर) येत्या शनिवारी काढण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस बुधवारपासून राज्याच्या दौऱ्यावर जाणार असून, त्यात सोलापूर जिल्ह्याचाही समावेश आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीची मुख्यमंत्री प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
मंगळवारी मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर तातडीने उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली आहे.
पंचनाम्यांना गती; केंद्राकडेही प्रस्ताव
दुष्काळग्रस्त परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारकडून मदत केली जाणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. दुष्काळासंदर्भातील प्राथमिक अधिसूचना शनिवारीपर्यंत जारी केली जाणार आहे. सध्या दुष्काळग्रस्त भागातील प्राथमिक माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे.
Post Views: 9