सोलापूर : सोलापूर शहरात पार पडणाऱ्या प्रमुख ९ मध्यवर्ती मंडळांच्या तसेच घरगुती गणपती विसर्जन मिरवणुकांसाठी शहर पोलिसांनी वाहतूक नियमनाबाबतचा अधिकृत जाहीरनामा जारी केला आहे. मिरवणूक मार्गावर नागरिकांची मोठी गर्दी होणार असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी व कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अन्वये हे आदेश दिले आहेत.
दिनांक २५ सप्टेंबर रोजी सकाळी ०६.०० वाजल्यापासून मिरवणूक संपेपर्यंत शहरातील प्रमुख मिरवणूक मार्गांवरील सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. यातून पोलीस वाहने, ॲम्बुलन्स, अग्निशामक दल व इतर अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना वगळण्यात आले आहे.
वाहतुकीसाठी बंद असलेले प्रमुख विसर्जन मार्ग:
१)लोकमान्य गणेशोत्सव: पत्रा तालीम ते गणपती घाट,२)मध्यवर्ती गणेशोत्सव: दत्त चौक ते गणपती घाट,३)पूर्व विभाग: कन्ना चौक ते सिद्धेश्वर मंदिर तलाव,४)लष्कर विभाग: नळ बाजार चौक ते कंबर तलाव (संभाजी तलाव),५)विजापूर नाका: सैफुल चौक ते कंबर तलाव,६)होटगी रोड: हत्तुरे वस्ती ते कंबर तलाव,७) घरकुल विभाग: पंचमुखी देवस्थान ते म्हाडा विहीर,८)निलमनगर: दुर्गादेवी मंदिर ते परळकर विहीर,९) बाळे परिसर.
प्रवासी वाहनांसाठी पर्यायी मार्ग:
दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनांसाठी विशेष पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिले आहेत:
१)विजापूरकडून पुणे किंवा हैदराबादकडे जाणारी वाहने नवीन विजापूर नाका-बायपास मार्गे केगाव ब्रिजवरून इच्छित स्थळी जातील.
२)हैदराबादकडून पुणे/विजापूरकडे जाणारी वाहने नवीन हैदराबाद नाका-मार्केट यार्ड-जुना पुना नाका-केगाव बायपास मार्गे जातील.
३)रेल्वे स्टेशन व एसटी स्टँडसाठी जुना पुना नाका व ५४ मीटर रोड मार्गाचा वापर करता येईल.
४)बार्शीकडून येणारी वाहने बार्शी टोलनाका-खेड मार्गे केगाव ब्रिजकडे वळवण्यात आली आहेत.
मिरवणूक संपेपर्यंत जड वाहतुक शहरात पूर्ण बंदी राहील मात्र मार्केट यार्ड चौक – जुना बोरामणी नाका – शांती चौक – अक्कलकोट रोड हा मार्ग जड वाहनांसाठी खुला राहील. आदेशाचा भंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.