सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल) परिसरातील विकसित उद्यान आणि मोठ्या झाडांची होत असलेली वृक्षतोड थांबविण्याच्या सूचना उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी दिल्या. नागरिक, डॉक्टर व रुग्णांकडून वृक्षतोड थांबविण्याची विनंती झाल्यानंतर देवकर यांनी बुधवारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना वृक्षतोडीला परवानगी कोणत्या नियम व अटींच्या आधारे देण्यात आली, याची सविस्तर चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले.
महानगरपालिकेची वृक्ष प्राधिकरण समिती अस्तित्वात असताना वृक्षतोडीपूर्वी समितीचे मत घेण्यात आले होते का, तसेच पर्यावरण व वृक्षतज्ज्ञांशी चर्चा करण्यात आली होती का, याचीही तपासणी करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.रुग्णालय परिसरातील हिरवाई रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना सावली, स्वच्छ हवा आणि प्रसन्न वातावरण देते. त्यामुळे चांगल्या स्थितीतील उद्यान हटवून बांधकाम करण्याची गरज काय, असा सवाल देवकर यांनी उपस्थित केला. बांधकामासाठी पर्यायी जागेचा विचार करता आला असता, तर झाडे तोडण्याची वेळ का आली, याचे स्पष्टीकरण प्रशासनाने द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
वृक्षतोड अपरिहार्य असल्याचे स्पष्ट झाल्यास शक्य तितक्या झाडांचे पुनर्लागवड करून योग्य हरित भरपाई करावी, अशाही सूचना त्यांनी दिल्या.विकास आवश्यक आहे; मात्र विकासाच्या नावाखाली पर्यावरणाची किंमत मोजावी लागू नये. रुग्णालय परिसरातील हिरवाई जपणे गरजेचे आहे, असे देवकर यांनी सांगितले.
—
Post Views: 14