सोलापूर – आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, करमाळा आणि सांगोला या तीन तालुक्यांच्या सर्वांगीण विकासासाठी निर्धारित करण्यात आलेले ३८ निर्देशांक वेळेत पूर्ण करून विकासकामांना अधिक गती द्या, असे स्पष्ट निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दिले.जिल्हा परिषदेत नीती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय व आढावा बैठक सीईओ कुशल जैन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, अक्कलकोटचे गटविकास अधिकारी शंकर कवितके, करमाळ्याचे गटविकास अधिकारी अमित कदम, सांगोल्याचे सहायक गटविकास अधिकारी वसंत फुले यांच्यासह जिल्हा व तालुका स्तरावरील आरोग्य, महिला व बालविकास, शिक्षण, कृषी, पशुसंवर्धन, पाणीपुरवठा, ग्रामविकास आदी विभागांचे अधिकारी आणि तालुका फेलो उपस्थित होते.
बैठकीत प्रत्येक विभागाच्या कामगिरीचे सादरीकरण करण्यात आले. प्रलंबित बाबी तातडीने पूर्ण करून शासनाने निश्चित केलेली उद्दिष्टे वेळेत साध्य करण्यावर भर देण्यात आला. तसेच विभागांमध्ये अधिक प्रभावी समन्वय ठेवून आकांक्षित तालुका कार्यक्रमाची अंमलबजावणी परिणामकारक करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
केंद्र शासनाने देशातील मागास भागांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू केलेल्या आकांक्षित तालुका कार्यक्रमात सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, करमाळा आणि सांगोला या तीन तालुक्यांचा समावेश आहे. या कार्यक्रमांतर्गत ३८ महत्त्वाच्या निर्देशांकांच्या आधारे तालुक्यांच्या प्रगतीचे सातत्याने मूल्यमापन केले जाते.
चौकट
कामगिरी अधिक उंचावण्यावर प्रशासनाचा भर
अक्कलकोटची राज्यात तिसऱ्या क्रमांकाची झेप
नीती आयोगाच्या आकांक्षित तालुका क्रमवारीत अक्कलकोटने महाराष्ट्रात तिसरे स्थान पटकावले असून, ही जिल्ह्यासाठी उल्लेखनीय बाब मानली जात आहे. तर सांगोला तालुकाही सातत्याने प्रगतीपथावर असून, निर्देशांकांमध्ये अधिक सुधारणा करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न तीव्र केले आहेत. करमाळा तालुक्यातील कामांनाही गती देऊन तिन्ही तालुक्यांची कामगिरी अधिक उंचावण्यावर प्रशासनाचा भर राहणार आहे.
कोट
उद्दिष्टपूर्तीसाठी ठोस कृती आराखडा तयार करून निर्धारित कालावधीत कामे पूर्ण करणे
जिल्ह्यातील आरोग्य, पोषण, शिक्षण, कृषी, पर्यावरण, पायाभूत सुविधा आणि सामाजिक विकास या क्षेत्रांतील कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रत्येक विभागाने उद्दिष्टपूर्तीसाठी ठोस कृती आराखडा तयार करून निर्धारित कालावधीत कामे पूर्ण करावीत, असे निर्देश देण्यात आल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी सांगितले.
Post Views: 14