वैराग – आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा अतिवापर आणि त्यामुळे वाढणारे सायबर गुन्हे ही आजच्या तरुण पिढीपुढील एक मोठी समस्या बनली आहे. या पार्श्वभूमीवर, बार्शी तालुक्यातील श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय, भातांबरे येथे आज २४ ऑक्टोबर २०२६ रोजी इयत्ता ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी “डिजिटल मित्र की शत्रू? सायबर ब्लॅकमेलिंग व सुरक्षितता” या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर विशेष प्रबोधन व मार्गदर्शन मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
‘एकता महिला मंच’चे प्रमुख प्रभाकर क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या सत्रात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
सोशल मीडिया: वापर मर्यादित हवा, अतिवापर धोक्याचा!
कार्यक्रमाची सुरुवात करताना आजच्या डिजिटल विश्वाचे वास्तव विद्यार्थ्यांसमोर मांडण्यात आले. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप, ट्विटर आणि स्नॅपचॅट यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या अतिवापरामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक व शैक्षणिक जीवनावर होणाऱ्या दुष्परिणामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी एकता महिला मंचचे प्रमुख प्रभाकर क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला देताना सांगितले की,”विद्यार्थ्यांनी आपल्या महत्त्वाच्या शैक्षणिक काळात सोशल मीडियाचा वापर अत्यंत मर्यादित व केवळ गरजेपुरताच केला पाहिजे, जेणेकरून त्यांच्या अभ्यासावर आणि भविष्यावर कोणतेही विपरीत परिणाम होणार नाहीत.”
सायबर गुन्हे व ब्लॅकमेलिंगपासून सावध राहण्याचे आवाहन
सत्रादरम्यान सायबर सुरक्षेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना अत्यंत मोलाचे तंत्रशुद्ध धडे देण्यात आले:
* अनोळखी व्यक्तींपासून दूर राहा: सोशल मीडियावर कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपल्या खात्यावर प्रवेश देऊ नका, त्यांच्याशी चॅटिंग किंवा संवाद साधू नका.
धोकादायक बाब म्हणजे, कोणतीही वैयक्तिक किंवा गुप्त माहिती सोशल मीडियावर शेअर करू नका.
* तत्काळ ब्लॉक करा: एखादी व्यक्ती वारंवार मेसेज करून त्रास देत असल्याशी चर्चा न करता त्या व्यक्तीला तत्काळ ‘ब्लॉक’ करा.
* संवादाची ताकद: कोणतीही अडचण आल्यास घाबरून न जाता आपल्या आई-वडिलांना, मोठ्या भावाला किंवा पालकांना सांगा. पालकांना सांगणे शक्य नसल्यास, ‘एकता महिला मंच’ नेहमी विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहे.
‘एकता मित्र पेटी’चा अभिनव उपक्रम
विद्यार्थ्यांच्या मनातल्या शंका, समस्या आणि अडीअडचणी कोणालाही न सांगता सुरक्षितपणे मांडता याव्यात, यासाठी ‘एकता महिला मंच’च्या वतीने विद्यालयात ‘एकता मित्र पेटी’ हा स्तुत्य उपक्रम सुरू करण्यात आला आहे. विद्यार्थी या पेटीत चिृट्यांच्या माध्यमातून आपले गंभीर प्रश्न नोंदवू शकतात, ज्यावर मंचकडून तातडीने योग्य ती मदत व मार्गदर्शन केले जाईल, अशी ग्वाही श्री. प्रभाकर क्षीरसागर यांनी दिली.
शेवटी, विद्यार्थ्यांनी सायबर गुन्ह्यांच्या विळख्यात न अडकता, सोशल मीडियाच्या मोहात न पडता आपले संपूर्ण लक्ष केवळ अभ्यास आणि उज्ज्वल करिअर घडवण्यावर केंद्रित करावे, असा प्रेरणादायी संदेश देत या यशस्वी मार्गदर्शन सत्राची सांगता झाली.