कुर्डुवाडी – किरकोळ मस्करी आणि सायकलचा धक्का लागल्याच्या वादातून उजनी (मा) ता.माढा येथे एकाचा दगड मारून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.ही घटना दि.३ रोजी उजनी (मा) ता.माढा येथे रा.१० वा
सुमारास घडली.संदीप शामराव निकम (वय ४८) रा.उजनी (मा) ता.माढा असे मयताचे नाव असून, भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करायला गेले असता त्यांच्यावर हा जीवघेणा हल्ला झाला. याप्रकरणी रुपेश बाबासाहेब लोकरे व प्रवीण बाबासाहेब लोकरे दोघे रा.उजनी (मा) ता.माढा या दोन सख्ख्या भावांवर कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात मयताचा पुतण्या समाधान हनुमंत निकम यांच्या फिर्यादीवरुन खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोजी फिर्यादीचे वडिल हनुमंत निकम व संशयित आरोपीचे वडिल बाबासाहेब लोकरे हे दोघे मित्र आहेत.त्यांची कोणत्या ना कोणत्या कारणावरून मस्करी चालू असते. दि. २ जुलै रोजीही अशीच मस्करी करत ते थांबले होते. त्यावेळी हनुमंत निकम यांच्या सायकलचा धक्का लागून बाबासाहेब लोकरे हे खाली पडले व त्यांच्या गुढग्याला मार लागला. याच कारणावरून फिर्यादी निकम आणि लोकरे कुटुंबात वाद झाला होता. याच वादाचा राग मनात धरून ३ जुलै रोजी रात्री १० वाजता दोन्ही संशयित आरोपी भावांनी फिर्यादीला छत्रपती शिवाजी महाराज चौकात गाठून बेदम मारहाण सुरू केली. यावेळी फिर्यादीचे चुलते संदीप निकम हे भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडले. याचा राग आल्याने संशयित आरोपी रुपेश लोकरे याने जमिनीवरील मोठा दगड संदीप निकम यांच्या छातीवर जोरात मारला आणि दोन्ही संशयित आरोपी त्यांच्या अंगावर जाऊन बसले.
या गंभीर हल्ल्यात संदीप निकम हे जागीच बेशुद्ध पडले. त्यांना तातडीने कुर्डुवाडी येथील रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अतुल मोहिते,सहा.पो.निरीक्षक अरविंद गटकूळ यांच्यासह पो.शि. सोलनकर, पो.शि. पो.ह मोरे, पो.ह.गोरे, पो.ह.हराळे ,पो.ह गोरे व पथकाने घटना स्थळाला भेट देऊन तपास चक्र फिरवत अवघ्या दोन तासात रा.१२ वा.सुमारास जवळच असलेल्या उसाच्या शेतातून लपलेल्या दोन्ही संशयित आरोपी भावांना अटक केली. अटक केलेले संशयित आरोपी रुपेश लोकरे व प्रवीण लोकरे यांना माढा न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना दि. ७ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.पुढील तपास सहा पो.नि. अरविंद गटकुळ हे करत आहेत.
Post Views: 27