सोलापूर – आषाढी एकादशी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने व्यापक तयारीला वेग दिला असून, यंदाच्या वारीत वारकरी, दिंड्या आणि पालखी सोहळ्यांसाठी गतवर्षीपेक्षा तब्बल दीडपट अधिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. पालखी मार्ग, मुक्कामस्थळे, रिंगण सोहळ्याची ठिकाणे आणि पंढरपूर शहरात आवश्यक पायाभूत सुविधांची उभारणी सुरू असून, पालखी सोहळा प्रमुखांनी सुचविलेल्या सुमारे ८० टक्के कामांची पूर्तता अंतिम टप्प्यात असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी दिली.
आषाढी यात्रेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी पंढरपूर येथे दहा मानाच्या पालख्यांचे विश्वस्त, सोहळा प्रमुख आणि विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत वारकऱ्यांच्या सुविधा, वाहतूक, स्वच्छता, आरोग्य आणि सुरक्षा यांसंदर्भातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. पालखी तळांचा विस्तार; सुविधा वाढविण्यावर भर
वारीदरम्यान दरवर्षी वाढणारी वारकऱ्यांची आणि दिंड्यांची संख्या लक्षात घेऊन यंदा पालखी तळांच्या क्षमतेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुक्कामस्थळांवर मुरमीकरण, सुलभ शौचालये, स्नानगृहे, वॉटरप्रूफ मंडप, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि रुग्णवाहिकांची संख्या वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे पावसाळी वातावरणातही वारकऱ्यांना अधिक सोयीस्कर सुविधा मिळणार आहेत.
पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या वाहनांना पेट्रोल किंवा डिझेलचा तुटवडा भासू नये यासाठी पालखी मार्गावरील सर्व पेट्रोल पंपांना आवश्यक सूचना देण्यात येणार आहेत. तसेच दिंड्यांच्या स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅसचा पुरवठा अखंडित राहील यासाठीही स्वतंत्र नियोजन करण्यात येत आहे. आषाढी यात्रेदरम्यान लाखो भाविक पंढरपूरकडे येत असल्याने आपत्ती व्यवस्थापन आराखड्यानुसार विशेष सुरक्षा व्यवस्था उभारण्यात येणार आहे. पोलीस बंदोबस्त, वैद्यकीय सुविधा, आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा आणि वाहतूक नियंत्रण यावर विशेष भर देण्यात येणार असून, पालखी मार्गावर कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी सर्व विभाग समन्वयाने काम करणार आहेत.
दरम्यान, मागील वर्षी प्रशासनाने पालखी मार्ग, तळ आणि रिंगणस्थळी केलेल्या सुविधा व व्यवस्थापनाबाबत पालखी सोहळा प्रमुखांनी समाधान व्यक्त केले. यंदाही त्याच पद्धतीने अधिक सक्षम आणि व्यापक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे बैठकीत अधोरेखित करण्यात आले. आषाढी वारी अधिक सुरक्षित, सुकर आणि सुविधायुक्त करण्यासाठी प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्ज केली असून, लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी व्यापक नियोजन अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे जिल्हा परिषदेचे सीईओ कुशल जैन यांनी सांगितले.
चौकट
पशुधनासाठीही स्वतंत्र व्यवस्था
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी सांगितले की, पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या बैलजोड्या आणि घोड्यांसाठी निवारा व वैद्यकीय सुविधांची व्यवस्था करण्यात येणार आहे. पशुवैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्यात येतील. तसेच पालखी मुक्कामस्थळे रिकामी होताच तातडीने स्वच्छता मोहीम राबविली जाईल.
चौकट
‘संत देव भेट’ सोहळ्यासाठी विशेष नियोजन
गोपाळकाला उत्सवानंतर सर्व मानाच्या पालख्या पूर्णिमेला श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दाखल होतात. यावेळी होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन पारंपरिक पद्धती जपून संत देव भेट सोहळ्याचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
चौकट
वारकरी प्रतिनिधींच्या महत्त्वाच्या सूचना
बैठकीत पालखी सोहळा प्रमुखांनी वाढत्या दिंड्यांच्या संख्येनुसार पालखी तळांचा विस्तार, अधिक पोलीस बंदोबस्त, पाणीपुरवठ्यासाठी वाढीव टँकर, वाहतूक व्यवस्थेचे प्रभावी नियोजन आणि मुक्कामस्थळांचे मुरमीकरण या प्रमुख मागण्या प्रशासनासमोर मांडल्या. प्रशासनाने या सर्व सूचनांची सकारात्मक दखल घेत आवश्यक कार्यवाही सुरू असल्याचे स्पष्ट केले.
Post Views: 24