अकलूज : पंढरपूर फलटण आणि देहू राष्ट्रीय रेल्वे मार्गांदरम्यान रेल्वे जोडणी निर्माण करण्याबाबत खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी दिनांक २७ मार्च २०२६ रोजी लोकसभेतील शून्य प्रहरादरम्यान प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री वी. सोमण्णा यांनी लेखी उत्तर दिले आहे.
रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंढरपूर -फलटण रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण कार्य पूर्ण झाले असून या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यात आला आहे. त्यामुळे या महत्त्वपूर्ण रेल्वे मार्गाच्या पुढील प्रक्रियेला आता गती मिळण्याची अपेक्षा आहे.
DPR तयार झाल्यानंतर प्रकल्पाच्या पुढील कार्यवाहीसाठी महाराष्ट्र शासनासह विविध संबंधित भागधारकांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे. तसेच नीती आयोग, केंद्रीय अर्थ मंत्रालय आणि इतर संबंधित यंत्रणांकडून आवश्यक परीक्षण व मंजुरीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार असल्याचे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, रेल्वे मंत्रालयाने प्रकल्प मंजुरीबाबतची प्रक्रिया ही सतत सुरू असणारी आणि गतिमान प्रक्रिया असल्याचे नमूद केले आहे. विविध संबंधित यंत्रणांकडून होणारे परीक्षण आणि आवश्यक मंजुरी यावर प्रकल्पाच्या अंतिम मंजुरीची कालमर्यादा अवलंबून असल्याचेही केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांनी आपल्या उत्तरात स्पष्ट केले आहे.
पंढरपूर- फलटण रेल्वे मार्गामुळे सोलापूर, माढा, पंढरपूर, माळशिरस तसेच फलटण परिसरातील दळणवळणाला मोठी चालना मिळण्यास मदत होणार असून, या मार्गामुळे धार्मिक पर्यटन, शेतीमालाची वाहतूक, उद्योग आणि स्थानिक रोजगाराच्या संधींना देखील बळ मिळण्याची अपेक्षा आहे.
खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी लोकसभेत सातत्याने हा प्रश्न उपस्थित करत आहेत, रेल्वे मंत्रालया बरोबर सतत लेखी पाठपुरावा करत आहेत. पंढरपूर फलटण रेल्वे मार्गचे सर्वेक्षण पूर्ण होऊन DPR तयार झाल्याची बाब या प्रकल्पाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण टप्पा मानली जात आहे
Post Views: 19