लोकसभेचा निकाल जाहीर झालाय पण भाजपला आणि शिंदे गटाला किंवा अजित गटाला राज्यात हवे तसे यश मिळवता आली नाही याचीच खदखद नेत्यांकडून बोलून दाखवली जात आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात मतदारांनी योग्य प्रतिसाद न दिल्याने महायुतीला जबर धक्का बसलाय मात्र लोकसभा निवडणुकीत उमेदवार निवडताना सुद्धा काही चुका झाल्या आहेत का? याचेसुद्धा आत्मचिंतन केले पाहिज असा थेट सल्ला वाशिम यवतमाळच्या माजी खासदार भावना गवळी यांनी दिला आहे.
गेली पाच टर्म वाशिम – यवतमाळ आणि भावना गवळी असे समीकरण जुळले होते यंदा मात्र परिस्थिती बदलली गेली. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भावना गवळी यांची उमेदवारी काढून घेण्यात आली आणि राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली पण कदाचित वाशिम यवतमाळमधील मतदारांना उमेदवारी बदलाबदलीचे गणित पटले नसावे असे गवळींनी बोलून दाखवले. पक्षांनी लोकांची इच्छा लक्षात घेतली नाही त्यामुळे नुकसान झाले असावे अशी त्यांनी शक्यता मांडली.
लोकसभा निवडणूक निकालानंतर गुरुवारी वाशीमला भावना गवळी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमच्या पक्षावर वेगवेगळ्या मार्गाने दबाव होता असे विधान त्यांनी केले आहे. माजी खासदार हेमंत पाटील यांनीही हे मान्य केले होते असे सुद्धा पुढे त्यांनी म्हटंले आहे.राजश्री पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर मी नाराज असल्याची चर्चा होती. मात्र मी नाराज नव्हती, मनात केवळ खंत होती, अशी स्पष्टोक्तीही गवळींनी दिली आहे.